प्रकाश… दिग्दर्शन… निर्मिती आणि बरंच काही!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रोहिणी निनावे,[email protected]

दिग्दर्शक, निर्माते राकेश सारंग. प्रसिद्ध आईवडिलांची भक्कम पार्श्वभूमी असूनही अक्षरश: पडेल ते काम मनापासून करून यशस्वी झालेल्या दिग्दर्शक….
राकेश सारंग हे नाव माहीत नाही असं इंडस्ट्रीमध्ये कुणीच नसेल. एकाहून एक सरस मालिका देणारे सुप्रसिद्ध कॅमेरामन आणि दिग्दर्शक! सिने-नाटय़ क्षेत्रातील दिग्गज अभिनेते कमलाकर सारंग आणि लालन सारंग यांचे सुपुत्र राकेश सारंग.

राकेश सारंग यांच्या ‘निर्मिती’ संस्थेसोबत मी बरंच काम केलं आहे. ‘अधुरी एक कहाणी’, ‘काटा रुते कुणाला’, ‘एक झुंज वादळाशी’, ‘कुंकू’सारख्या मालिकांचं शीर्षकगीत. त्यामुळे आमची चांगलीच ओळख. बऱयाच दिवसांत आमची भेट नव्हती. एरवी अंधेरीच्या लोखंडवालामधल्या त्यांच्या ऑफिसमध्ये कामानिमित्त अनेकदा येणं व्हायचं. राकेशजी आणि त्यांची पत्नी संगीता हिच्याशी अवांतर गप्पाही व्हायच्या. आज मुलाखतीच्या निमित्ताने पुन्हा जुन्या आठवणी जाग्या झाल्या.

नेहमीप्रमाणे मी वेळेवरच त्यांच्या ऑफिसमध्ये पोहोचले. ऑफिसमध्ये ‘क्राइम पॅट्रोल’च्या टीमची मीटिंग चालू होती. आधी सध्या काय चालू आहे वगैरे बोलणं झालं. मग गप्पांच्या ओघातच मी विचारलं, तुम्ही या क्षेत्राकडे कसे वळलात… म्हणजे आईवडील याच क्षेत्रात असल्यामुळे का? राकेशजी म्हणाले, मी अपघातानेच आलो म्हणा ना!

कॉलेजमध्ये असताना आंतरमहाविद्यालयीन नाटय़स्पर्धांच्या वेळी एका कॉलेजकडून दुसऱया कॉलेजची एकांकिका पाडायचे प्रकार व्हायचे. असे प्रकार होण्यापासून थांबवण्यासाठी मला बोलावलं जायचं. असं करता करता मी एकांकिका बघायला लागलो आणि एकांकिकांबद्दल आवड निर्माण झाली. शिकण्याची हौस असल्यामुळे मी सगळय़ा गोष्टी आत्मसात करायला लागलो. हळूहळू बॅकस्टेजची, लाईट्सची कामं करायला लागलो. एकांकिकांमध्ये अभिनय करायला लागलो.

प्रत्येकाचं स्वप्न असतं, चित्रपटांमध्ये काहीतरी करावं, म्हणून पुरुषोत्तम बेर्डेना भेटायला गेलो. पण सिनेमाची तारीख पुढे पुढे जात गेली. तेव्हा बेर्डेंनी मला सुचवलं की, तोवर एखाद्या कॅमेरामनकडे असिस्टंट म्हणून काम कर… आणि मला एका खूप मोठय़ा कॅमेरामनकडे पाठवलं. ते म्हणजे चारुदत्त दुखंडे. खरं तर मी त्यांना भेटायला गेलो त्यावेळी नेमकं त्यांच्याकडे काही काम नव्हतं. म्हणून मी फक्त माझा नंबर त्यांच्याकडे देऊन आलो. गंमत म्हणजे, त्याच रात्री मला त्यांचा फोन आला की, अरे तू गेलास आणि माझ्याकडे काम आलं. उद्यापासून शूट आहे. तिथून माझी कॅमेरामन म्हणून सुरुवात झाली.

मम्मीला मी हे सांगितलं तेव्हा तिने मला टॅक्सीमध्ये घातलं आणि एका मोठय़ा कॅमेरामनचं चाळीमध्ये असलेलं छोटं घर दाखवलं आणि म्हणाली, एकेकाळी यांच्याकडे खूप काम होतं, खूप नाव होतं पण आज यांच्याकडे काहीच काम नाही. पैसे नाही. आपल्या क्षेत्राचं काही खरं नसतं. तरी तुला हे करायचं आहे? मी म्हटलं, हो मम्मी, माझं ठरलं आहे, आणि मी कामाला लागलो. त्यातच गौतम अधिकारीचं काम आलं. सेटवर गेल्यावर मी माझ्या सवयीप्रमाणे आधी स्क्रीप्ट वाचलं. गौतमजी आले म्हणाले, तुने स्क्रीप्ट क्यों पढा? मी म्हटलं, शूट करना है तो स्क्रीप्ट पढना जरूरी है. गौतमजींना काय वाटलं कोण जाणे… त्यांनी हळूहळू कॅमेरा माझ्यावर सोपवला. तंत्राच्या बाबतीत ते बापमाणूस होते. या अर्थाने ते या क्षेत्रातले माझे पहिले गुरू होते.’ मी म्हटलं, ‘आणि माझेही’. राकेशजी म्हणाले, ‘गौतम अधिकारींना माणसांची चांगलीच पारख होती. शिवाय नवीन माणसांवर विश्वास टाकण्याची धमकही. (इथे आम्ही दोन दशकं काम करूनही काही लोक आमच्यावर विश्वास दाखवत नाहीत) मी म्हटलं, ‘हो ना… कुठलाही पूर्वानुभव नसताना त्यांनी मला मराठीमधली पहिली दैनंदिन मालिका ‘दामिनी’ लिहायला दिली होती.’

राकेशजी पुढे म्हणाले, स्वतंत्रपणे कॅमेरा मी हाताळला तेव्हा माझ्यापुढे कलाकार कोण असतील… खुद्द माझे आईवडील. कमलाकर सारंग आणि लालन सारंग. शिवाय अत्यंत कॉम्प्लेक्स असा शॉट. पण मी तो आत्मविश्वासाने पूर्ण केला आणि मी त्यांचा आवडता बनलो. एक उत्तम दिग्दर्शक बनायचं असेल तर तुम्हाला कॅमेरा वर्क माहीत असायलाच हवं.

पुढे रमण कुमार यांच्याशी ओळख झाली. त्यांच्याकडून मी पटकथेविषयी शिकलो, त्यांचे गुरू जावेद अख्तर. तेव्हा मालिका असो की चित्रपट… कथा हीच हीरो असते. कण्टेण्ट महत्त्वाचा असतो. हा कण्टेण्ट मग दिग्दर्शक, कॅमेरामन, मेकअपमन, संगीतकार सजवत असतात. मी ‘शतरंज’ नावाची हिंदी मालिका केली. मग पुन्हा असा काळ आला की, काम मिळत नव्हतं. पैसे मिळत नव्हते. एका मोठय़ा दिग्दर्शकाने नाकारलेली गोष्ट प्रसिद्ध निर्माते मनीष गोस्वामी यांनी मला वाचायला दिली. मी ती गोष्ट करायची तयारी दर्शवली. माझ्याकडे काम नव्हतं म्हणून नाही, मला ती गोष्ट आवडली म्हणून. कथा आवडल्याशिवाय मी ती मालिका करतच नाही. ती मालिका म्हणजे ‘आशीर्वाद’. बस! ते म्हणतात ना… उसके बाद मैंने पीछे मुडकर नहीं देखा वगैरे तसं…! मला कामाचं वेड आहे आणि मी झपाटल्यासारखं काम करायचो. दिवसभर शूट केल्यावर संध्याकाळी पुन्हा लेखकांबरोबर कथेविषयी चर्चा करायचो.

मी म्हटलं, तुम्ही क्रीप्टमध्ये इतका इंटरेस्ट घेता… पण दिग्दर्शक म्हणून इंटरफिअरही करता का? तुम्हाला हवं तेच करायला सांगता का? राकेशजी हसले. म्हणाले, दिग्दर्शक हा फक्त स्वतःचं मत सांगू शकतो, पण कथेबाबत आग्रही फक्त लेखकच असू शकतो, कारण तो त्या कथेचा जन्मदाता असतो. त्याने त्याला घडवलेलं असतं. रूपरंग दिलेलं असतं, संस्कार दिलेले असतात. तेव्हा अंतिम शब्द मी लेखकाचा मानतो. राकेशजींच्या या वाक्यासाठी मी मनोमन टाळय़ा वाजवल्या.

मी म्हटलं, पण आज विशेषतः मालिका दिग्दर्शकाला कशासाठीच वेळ मिळत नाही. मग त्याने त्याची क्रिएटिव्हिटी कशी पाळावी? राकेशजी म्हणाले, वेळेचं बंधन आज सगळीकडेच आहे, तरीही खूप ठिकाणी क्वालिटी वर्क होतंच आहे. दिग्दर्शक जहाजाचा कॅप्टन आहे. तेव्हा स्क्रीप्ट वेळेवर येईल याच्याकडे त्याने कटाक्षाने लक्ष द्यायला हवं. दिग्दर्शकावर अनेक जबाबदाऱया असतात. त्या त्याने नीट पार पाडल्या तरच प्रोजेक्ट चांगला होऊ शकतो. या क्षेत्रात टिकून राहायचं असेल तर निष्ठेने काम करायची गरज आहे. चॅनेलचा टीआरपी वाढवून फक्त त्यांच्या गुड बुक्समध्ये राहायचं की चांगलं मोजकं क्वालिटी वर्क करून प्रेक्षकांना काहीतरी दर्जेदार द्यायचं हे ज्याने त्याने ठरवावं.

मी विचारलं, तुम्हाला कधी नाटक दिग्दर्शित करावंसं नाही वाटलं का? तर ते म्हणाले, रोहिणी नाटक ही घाईघाईत करायची गोष्ट नाही. चोखंदळ प्रेक्षक नाटक बघतात. पॉपकॉर्न खात बघत नाहीत. मी इतका बिझी होतो आणि आताही आहे की, मला तेवढा शांत वेळ मिळाला नाही हे यावरचं प्रामाणिक उत्तर आहे.

मी विचारलं, हल्ली बायोपिक्सचं खूप पीक आलं आहे. ऍप्रिसिएशनबरोबर टीकाही होते आहे. बरेचदा नायकाची नकारात्मक बाजूच दाखवली जाते आहे. राकेशजी म्हणाले, बायोपिक बनवणं ही खूप मोठी जबाबदारी आहे. लेखकाने आणि दिग्दर्शकाने त्यावरच्या संशोधनासाठी काही काळ देणं गरजेचं आहे आणि एक सर्वांगीण आणि संतुलित असं व्यक्तिचित्र उभं करणं आवश्यक आहे. समाजप्रतिमेचाही विचार करून मांडणी करायला हवी.

मी म्हटलं, बरोबर… हल्लीच तुम्ही एक चित्रपट दिग्दर्शित केलात, ‘रणांगण’ नावाचा. तर एक प्रश्न असा विचारावासा वाटतो की, हल्ली खूप चित्रपट बनतात. पण त्यात अर्थगर्भ, नवीन काही सांगणारे चित्रपट किती असतात, तर फक्त मनोरंजक सिनेमे बनवण्याकडे लोकांचा कल का दिसतो? राकेशजी म्हणाले, कारण गंभीर, ऑफ बीट चित्रपटांना बुकिंग नसतं. निर्माता स्वतःचे पैसे घालून चित्रपट बनवतो तेव्हा त्याला रिटर्नची अपेक्षा असतेच. त्यातही एक चांगला विचार देणं हे आपलं काम आहे.

हल्ली तुम्ही निर्मितीकडे वळला आहात, दिग्दर्शन सोडलं का? मी हसत विचारलं. ते म्हणाले, माणसाच्या अंगात जी कला असते ती त्याला कधीच गप्प बसू देत नाही. मी फक्त एक अंतराय घेतला आहे, पण निर्माता हासुद्धा एक प्रकारे दिग्दर्शकच असतो, पडद्यामागचा… आता मी ‘क्राइम पॅट्रोल’ करतो आहे. हा प्रकार मला खूप आवडतो. पूर्वीपासून. माझ्यातला लेखकी किडा सतत काहीतरी लिहीत असतो.

खूप छान गप्पा रंगल्या होत्या, पण पुढे त्यांना एक मीटिंग होती. मी त्यांचा निरोप घेतला. राकेश सारंग हे एक भारदस्त व्यक्तिमत्त्व आहे. प्रत्यक्षातही आणि एक दिग्दर्शक-निर्माता म्हणूनही. मनोरंजन क्षेत्रात त्यांचं नाव ठळक आहे आणि राहील असं मनाशी म्हणत मी परत निघाले.