अनुभवसंपन्न उपासना..आवडत्या कामाची!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रोहिणी निनावे,[email protected]

दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे-जोशी, मेहनत… परिश्रम… आणि अभ्यास… या त्रिसूत्रीवर त्यांचा पराकोटीचा विश्वास…

स्वप्ना वाघमारे-जोशी हे नाव खूप ऐकलं होतं. श्रावणी देवधर यांच्याबरोबर चर्चा करत असताना त्या आल्या तेव्हा आमची पहिली भेट झाली, जुजबीच… पण तेव्हाच त्यांचा हसरा चेहरा, दिलखुलास बोलणं यावरून त्यांच्या निर्मळ स्वभावाचा अंदाज आला.

अंधेरी पश्चिमेला सब टीव्हीच्या मागच्या गल्लीतील छोटेखानी, शांत अशा ‘बिग मग’ नावाच्या कॅफेमध्ये आम्ही भेटलो. अगदी वेळेवर त्या पोहोचल्या. वेळ पाळणाऱयांचं मला कौतुक वाटतं. खूप छान ड्रेस घातला होता त्यांनी. आज त्या आणखीनच फ्रेश दिसत होत्या. मला तुम्ही नाही तू म्हण असं जरी त्या म्हणाल्या तरी माझी जीभ तू म्हणायला काही धजावत नव्हती.

स्वप्नाताईंनी बोलताना जे काही सांगितलं ते ऐकून मी थक्क झाले. उगाच काहीही पार्श्वभूमी आणि शिक्षण नसताना दिग्दर्शक होणारे कैक असतात, पण कुठल्याही विद्येच्या कलेसाठी प्रतिभेबरोबर शिक्षणाची गरज असतेच. मी त्यांना विचारलं, हे कलेविषयीचं बीज केव्हापासून रुजलं तुमच्या मनात?

त्या म्हणाल्या, माझं बालपण बडोद्यात गेलं. आईवडील दोघांनाही नाटकाची आवड होती. आई नाटकं लिहायची, बसवायची. त्या अर्थाने आईबाबाच माझे या क्षेत्रातले गुरू आहेत. यादरम्यान एन.एस.डी.चे यशवंत केळकर यांच्याशी माझी भेट झाली. ते मला म्हणाले, तू या विषयाची डिग्री घ्यावीस असं मला वाटतं. तुला खूप काही शिकता येईल. शिकायची, वाचायची मला आवडच होती. त्यामुळे मी भरपूर वाचलं, अभ्यास केला. मला ड्रमाटिक्समध्ये बॅचलर्स आणि मास्टर्स या दोन्हीमध्ये गोल्ड मेडल मिळालं. हिंदी साहित्यातही मी एम.ए. केलं आहे. कबीर, रहीम, मैथिलीशरण गुप्त, दिनकर, बच्चन हे माझे आवडते कवी आहेत.

मी स्वतःही हिंदीमधून एम.ए. केलं असल्याने आमच्या दोघींच्या त्याविषयी गप्पा झाल्या. ‘बिग मग’मधल्या सुरेख कॉफीचा आस्वाद घेत मी विचारलं, पण मुंबईमध्ये कशा काय आलात? त्या म्हणाल्या, मी सात वेळा ‘टुरटुर’ हे नाटक पाहिलं आहे. मी लक्ष्मीकांत बेर्डे आणि विजय कदम यांच्या अभिनयाची चाहती होते. त्यांच्याशी ओळख झाली आणि त्यांच्यामुळे नीलकांती पाटेकर यांच्याशीही ओळख झाली.’

‘मन वढाय वढाय’ या मालिकेपासून माझा दिग्दर्शन क्षेत्रात प्रवेश झाला. अर्थात तोही फोर्थ डिरेक्टर म्हणून. मूळ दिग्दर्शक कोण होते माहीत आहे… राजदत्त! नाम ही काफी है वगैरे. त्यांच्याकडून खूप शिकायला मिळालं. त्यानंतर संजय सूरकरांकडे ‘राऊ’ या मालिकेसाठी सहायक म्हणून काम केलं.

याच दरम्यान ‘डरने का नहीं’ या हिंदी मालिकेसाठी काम केलं. तीन गुजराथी नाटकांसाठीही. त्यानंतर एकता कपूरशी माझी ओळख झाली. एकता तेव्हा जेमतेम अठरा वर्षांची होती. तिच्या ‘मानो या ना मानो’ मालिकेच्या दिग्दर्शनाची जबाबदारी तिने माझ्यावर सोपवली. तेव्हा मी प्रेग्नन्ट होते. एकताने माझ्यासाठी हॉस्पिटलच्या बेडची व्यवस्था केली होती आणि चक्क बेडवर पडून मी हॉरर मालिकेचं दिग्दर्शन केलं. यानंतर एकताबरोबर खूप काम केलं. ‘कॅप्टन हाऊस’, ‘कर्मा’, ‘करम’, ‘कुटुंब’. ‘कहना है कुछ मुझको’ वगैरे. मग मालिकांचा सिलसिलाच सुरू झाला. त्या म्हणाल्या, प्रत्येक मालिकेगणिक नवीन नवीन अनुभव मिळत गेले आणि दिग्दर्शका म्हणून मी समृद्ध होत गेले.

मी विचारलं, मग मराठीकडे कशा काय वळलात? त्या म्हणाल्या, मला मराठीमध्ये काहीतरी चांगलं प्रोडय़ूस करायचं होतं. मी स्टार प्रवाहवर प्रोडय़ूस केलेली मालिका ‘देवयानी’ खूप गाजली.

चित्रपटाच्या बाबतीत बोलायचं झालं तर, पुढे माझी आणि स्वप्नील जोशीची ओळख झाली. आमच्या नामसाधर्म्यामुळे कैकदा त्याच्यासाठी असलेले फोन माझ्याकडे आणि माझ्यासाठी असलेले फोन त्याच्याकडे जायचे. एक दिवस स्वप्नीलचा फोन आला की मराठी चित्रपट करशील का? मी म्हटलं करूया. मग तीन-चार महिने कथेवर खल करून जो सिनेमा केला तो म्हणजे ‘मितवा’. या चित्रपटानंतर स्वप्नीलशी एक वेगळंच आपुलकीचं नातं जुळलं. तसंच सुबोधच्या बाबतीतही झालं. दोन्ही मुलं गोड आहेत. मी चित्रपट करते आहे म्हटल्यावर गोष्ट काय आहे हे सुद्धा न विचारता तारखा देतात. त्यानंतर सुबोध भावे आणि स्वप्नीलचा ‘फुगे’ आला. मग ‘लाल इश्क’, ‘तुला कळणार नाही’, ‘सविता दामोदर परांजपे’ आणि आत्ताच रिलीज झालेला ‘माधुरी’.

मी म्हटलं तुम्ही ‘हीट क्वीन’ आहात. त्या हसल्या. मी म्हटलं यापैकी ‘फुगे’ आणि ‘सविता दामोदर परांजपे’ या चित्रपटांचा प्रोडय़ूसर आहे जॉन अब्राहम आणि ‘लाल इश्क’चे प्रोडय़ूसर होते संजय लीला भन्साळी. या अमराठी प्रोडय़ूसर्सबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता?

त्या म्हणाल्या, संजय लीला भन्साळी हे उत्तम मराठी बोलतात. कथा त्यांनी ऐकली, त्यांना आवडली मग त्यांनी कुठलाही हस्तक्षेप न करता माझ्यावर सगळं सोपवलं. एडिटिंगच्या वेळी मात्र आमच्या ज्या काही भेटी झाल्या तेव्हा खूप गोष्टी त्यांच्याकडून शिकायला मिळाल्या. ही इज अ ड्रीम प्रोडय़ूसर. जॉनला मात्र सगळय़ा गोष्टीत इंटरेस्ट आहे. तो जातीने लक्ष घालतो. मात्र मला माझं स्वातंत्र्य असतं. दिग्दर्शकाला आणखी काय हवं!

मी विचारलं, चित्रपटाची निवड करताना तुम्ही स्त्रr दिग्दर्शिका आहात म्हणून काही वेगळा विचार करता का? म्हणजे स्त्रियांविषयीच चित्रपट करायचे, त्यांच्या मनातलं द्वंद्व मांडायचं.स्वप्नताई म्हणाल्या, मी असं काही मानतच नाही. गोष्ट चांगली असली पाहिजे, जी करताना आपल्याला मजा यायला हवी आणि बघणाऱयाला.

मी म्हटलं, तुम्ही अनेक मालिका केल्या आणि मग चित्रपट या दोघात काय फरक वाटतो, दिग्दर्शक म्हणून? तर त्या हसत म्हणाल्या, इथे लगेच फीडबॅक नसतो टीव्हीसारखा. मी पहिला चित्रपट केला तेव्हा म्हटलं अरे वा आपल्याला इथे कुणी सांगणार नाहीय हे पडदे बदला, हा ऍक्टर बदला, हे लोकेशन बदला. इथे आपण आपल्या कल्पनेप्रमाणे हवं तसं करू शकतो. आपल्यावर फार मर्यादा किंवा दबाव नसतो. वेळ असतो त्यामुळे क्वालिटी वर्कही करता येतं.
मी म्हटलं, अलीकडेच तुमचा ‘माधुरी’ हा चित्रपट आला. त्यात तुमच्या मुलीने संहिताने काम केलं आहे. तिला दिग्दर्शित करताना कसं वाटलं? त्या म्हणाल्या, आपल्या जवळच्या व्यक्तीला दिग्दर्शित करताना… आपण फार बायस तर होत नाही ना, फेव्हरिंग तर होत नाही ना… किंवा उगाच कठोर तर होत नाही ना असं वाटत राहतं. संहिताने मला तशी संधीच दिली नाही. तिने इतकं छान काम केलं, मला खूप अभिमान वाटला तिचं काम पाहून.

मी म्हटलं, नवोदित कलाकारांवर खूप मेहनत घ्यावी लागत असेल ना? त्या म्हणाल्या, खूपच. आम्ही नियमित 3-4 दिवसांचं वर्कशॉप घेतो त्यांचं! अनेक गोष्टी त्यांना शिकवतो. कॅमेरा कसा फेस करायचा, डोळय़ांतून कसं व्यक्त व्हायचं, आपला डायलॉग नसला तरी कसं रिऍक्ट करायचं वगैरे…

अभिनेता म्हणून काय आणि दिग्दर्शक म्हणून काय. या क्षेत्रात यायचं असेल तर खूप मेहनत करावी लागते. कुणाला दारू पाजून, पाटर्य़ा देऊन, मस्का लावून काम मिळत नसतं. इथे कुठलाही शॉर्टकट कामाला येत नाही. हे प्रोफेशन म्हणजे एक सायन्स आहे, ते शिकावं लागतं. हे एक जागृत दैवत आहे असंही म्हणता येईल. तुम्ही श्रद्धेने इमानाने जेवढं द्याल, तेवढं तुम्हाला परत मिळतं. आणखी एक गोष्ट म्हणजे गर्दी आणि आर्मीमध्ये एका हाताचं अंतर असतं. खूप लोकांना जवळ केलं किंवा लोकांना खूप जवळ केलं तर गर्दी होते आणि एका हाताचं अंतर ठेवलं तर शिस्त राहते. तेव्हा हे एका हाताचं अंतर महत्त्व असतं. स्वतःसाठी स्पेस ठेवा आणि लोकांना स्पेस द्या. मग हसत म्हणाल्या, खूप गंभीर बोलले का मी? आम्ही दोघी हसलो. मी म्हटलं, खूप महत्त्वाचं बोललात! स्वप्नाताईंचे अनमोल अनुभव मनात साठवून घेत आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देत मी त्यांचा निरोप घेतला.