
कोळी नृत्य, सुगम संगीत अशा बहारदार सादरीकरणाने ठाण्यात दिव्यांग मुलांचा कलाविष्कार रंगला. निमित्त होते स्वयंम पुनर्वसन केंद्र आयोजित ऊर्जा 2019 या कार्यक्रमाचे. गडकरी रंगायत येथे झालेल्या या कार्यक्रमामध्ये 11 शाळांच्या शेकडो मुलांनी आपली कला सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
ठाण्यात बहुविकलांग मुलांचे पुनर्वसन केंद्र चालवणाऱया स्वयंम केंद्राच्या नीता देवळालकर यांनी 2017 पासून ऊर्जा या उपक्रमाला सुरुवात केली. दर दोन वर्षांनी असाच कार्यक्रम घेऊन दिव्यांग मुलांच्या कलाविष्काराला व्यासपीठ मिळवून देण्याचा निश्चय त्यांनी केला आहे. त्यानुसार यंदा गडकरी रंगायत येथे शनिवारी सायंकाळी झालेल्या कार्यक्रमात ठाण्याच्या झवेरी कर्णबधिर शाळेतील मुलांनी कोळी गाण्यांवर सुंदर नृत्य सादर केले. तर स्नेहालय शाळेतील विद्यार्थिनीने ‘सुन्या सुन्या मैफलीत माझ्या’ हे गाणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली. याशिवाय सिंबा चित्रपटातील आँख मारे, खेळ मांडियेला अशा अनेक गाण्यांवर नृत्य सादर करून दिव्यांग मुलांनी ‘हम भी किसीसे कम नही’ हे सिद्ध करून दाखवले.
यावेळी शिवसेना नेते, पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर मीनाक्षी शिंदे, सभागृहनेते नरेश म्हस्के आवर्जुन उपस्थित राहिले व दिव्यांग मुलांचा उत्साह वाढवला. मान्यवरांच्या हस्ते या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व शाळांना मानचिन्ह तर विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रक देऊन गौरवण्यात आले असल्याचे आयोजिका नीता देवळालकर यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेत्री दीप्ती भागवत यांनी केले.
मुलांनी मने जिंकली
दोन वर्षांपूर्वी आम्ही जिल्हा स्तरीय ऊर्जा या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यंदा काही कारणाने हा कार्यक्रम शहरापुरताच मर्यादित ठेवण्यात आला. मात्र तरीही त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. सुमारे 15 शाळांच्या 200 मुलांनी प्रथम फेरीसाठी सहभाग घेतला होता. 31 ऑगस्टला गडकरी रंगायतन येथेच मंदार टिल्लू, नरेंद्र बेडेकर, बाळकृष्ण ओडेकर, किशोर सुतार या परीक्षकांनी त्यापैकी 11 शाळांमधून 100 जणांची निवड केली. त्यापैकी 96 विद्यार्थ्यांनी अंतिम फेरीत सादरीकरण करून सर्वांची मने जिंकली, असे ‘स्वयंम’च्या संस्थापिका आणि ऊर्जा कार्यक्रमाच्या आयोजिका नीता देवळालकर यांनी सांगितले.

































































