बनावट कोरोना तपासणी प्रयोगशाळेवर जिल्हा प्रशासनाची कारवाई, लॅब चालकावर गुन्हा दाखल

तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील एका बनावट कोरोना तपासणी प्रयोगशाळेवर जिल्हा प्रशासनाने कारवाई करत संबंधितांवर नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील पवार लॅब या ठिकाणी कोरोना तपासणी केली जात असल्याची माहिती जिल्हा प्रशासनास मिळाली होती.

या प्रकरणी जिल्हाधिकारी डॉ. कौस्तूभ दिवेगांवकर यांनी तुळजापूरच्या तहसीलदारांना तात्काळ शहानिशा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार अणदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एन. शेटे यांनी आरोग्य केंद्रातील लॅब टेक्नीशियन, तलाठी आणि ग्रामसेवक यांच्या समवेत जाऊन सदर ठिकाणी पाहणी केली. यावेळी पवार लॅबचे मालक संजय नरसिंग पवार (42) यांच्याकडे लॅबचा परवाना व त्याबाबत कोणतीही कागदपत्रे आढळून आली नाहीत.

या ठिकाणी कोविड तपासणी केलेली 47 किट व कोविड तपासणी किटचे दोन रिकामे बॉक्स आढळून आले. तपासणी किटपैकी 28 किट पॉझिटिव्ह असल्याचे यावेळी लक्षात आले. त्यामुळे संबंधित मालकाने विनापरवाना कोविड-19 ची तपासणी करून जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्याने त्यांच्याविरुद्ध 11 मे रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता 860 कलम 188, 269 व 270 अधिनियम 197 चे कलम 23 व 44 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या