कोरेगाव तालुक्यातील अनपटवाडीच्या सरपंच रुपाली प्रशांत मुळीक यांचे ग्रामपंचायत सदस्यपद अपात्र ठरविण्याचा सातारा जिल्हाधिकाऱयांनी दिलेला निर्णय पुण्याच्या अतिरिक्त विभागीय आयुक्त कविता द्विवेदी यांनी रद्द केला
आहे. या निर्णयामुळे तक्रारदार मनोज अनपट यांना चपराक मिळाल्याची चर्चा रंगली आहे.
अनपटवाडीच्या सरपंच रुपाली मुळीक यांच्या विरोधात अनपटवाडीचे माजी सरपंच मनोज मधुकर अनपट यांनी रुपाली मुळीक सरपंच असूनदेखील त्यांनी ग्रामपंचायत जागेत अतिक्रमण केले आहे, त्यामुळे मुळीक यांचे ग्रामपंचायत सदस्यपद आणि सरपंचपद अपात्र घोषित करावे, अशी लेखी तक्रार जिल्हाधिकाऱयांकडे केली होती. या तक्रारीवरून जिल्हाधिकाऱयांनी 13 जुलै 2023 रोजी रुपाली मुळीक यांचे सदस्यपद अपात्र म्हणून निर्णय दिला होता. जिल्हाधिकाऱयांच्या या निर्णयाला सरपंच रुपाली मुळीक यांनी पुणे येथील अतिरिक्त उपविभागीय आयुक्त कविता द्विवेदी यांच्याकडे आव्हान दिले होते.
या अपिलावर निर्णय देताना अतिरिक्त विभागीय आयुक्त कविता द्विवेदी यांनी सरपंच रुपाली मुळीक यांनी ग्रामपंचायतीच्या जागेवर अतिक्रमण केले नसून, अतिक्रमण म्हणून सांगितलेली जागा ही रुपाली मुळीक यांचे सासरे प्रकाश मुळीक यांच्या खासगी मालकीची आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या जागेत अतिक्रमण झाले आहे, हे सिद्धच होऊ शकत नाही. त्यामुळेच जिल्हाधिकाऱयांनी सरपंच रुपाली मुळीक यांच्याबाबत दिलेला अपात्रतेचा निर्णय रद्द केला. या निर्णयानंतर सरपंच मुळीक यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
…अन्यथा जनता तुम्हाला धडा शिकवेल!
z अनपटवाडीच्या सरपंचपदाचा कार्यभार स्वीकारताच आम्ही सर्वांना बरोबर घेऊन गावचा विकास केल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यामुळेच आकसबुद्धीने, सूडभावनेने विरोध करून आम्हाला संपविण्याचे षडयंत्र रचले होते. परंतु अतिरिक्त विभागीय आयुक्तांनी आमच्या बाजूने निकाल देऊन विरोधकांना त्यांनी जागा दाखवली आहे.