
>>दिव्या सौदागर
आजची जेन झी तरुणाई आचारविचारांच्या बाबतीत स्वतंत्र आहे खरी, पण स्वतच्या मानसिक आरोग्याबाबत जास्तीत जास्त जागरूक राहण्याची गरज आहे. स्वतला मानसिकदृष्टय़ा सक्षम बनवणं हे या पिढीचं आव्हान आहे.
नयनासाठी आजची सकाळही प्रसन्न नव्हती. तिचा मुलगा यश (दोघांची नावे बदलली आहेत) सकाळी साडेसहाला झोपला होता. रात्रभर तो तिच्या कुशीत रडतच होता. विशीत असलेल्या यशला हमसाहमशी रडताना पाहून नयनालाही गलबलून येत होतं. त्याची हतबलता पाहून तिचा जीवही जळत होता, पण तीही काही करू शकत नव्हती. कारण त्या प्रसंगावेळी ती तिथे उपस्थित नव्हती. झालं असं होतं, यश सुट्टीत त्याच्या आजोळी राहायला गेला होता. सुट्टी आणि आजी-आजोबांचं घर हे त्याचं नेहमीचं वेळापत्रक ठरलेलं होतं. त्यात नुकतंच मामाचं लग्न झालेलं होतं. नवीन मामी दिसायला आणि बोलायला खूपच छान होती. एकुलता एक मामा आणि मामाला एकुलता एक भाचा यश अशी मामा-भाच्याची जोडी आधीच घट्ट होती. त्यामुळे नव्या मामीशीही यशची जोडी जमायला फारसा वेळ लागला नाही. त्यामुळे यंदा यश आधीपेक्षाही आजीकडे जायला उत्सुक झाला होता. जशी कॉलेजची परीक्षा संपली तसा तो थेट आजीकडे उतरला. दुपारची वेळ होती. मामी ऑफिसला तब्येत बरी नसल्याने गेली नव्हती. घरी आराम करत होती. मामा ऑफिसला गेला होता. यश थेट मामीला भेटायला म्हणून तिच्या बेडरूममध्ये शिरला आणि जागच्या जागी खिळला. मामी गाढ झोपली होती. तिचं पांघरूण तिच्या अंगावरून बाजूला झालेलं होतं आणि नेमका गाऊन तिच्या ढोपरापर्यंत वर गेला होता. कोणीतरी आल्याची चाहूल लागताच ती दचकून जागी झाली, पण यश तिच्याकडे नेमका एकटक बघत होता. तिने पटकन स्वतचे कपडे सावरले आणि ती जोरात त्याच्यावर ओरडली. यश भानावर आला आणि अत्यंत शरमेने खाली मान घालून निघून गेला. मामीही त्याच्या मागोमाग बाहेर आली ती त्याच्यावर ओरडतच. आजी-आजोबाही सुनेचा ओरडण्याचा आवाज ऐकून घाबरले. यश तेव्हाही मान खाली घालून उभा होता. मामीच्या बोलण्यावरून त्या दोघांनाही काय घडलं होतं हे समजलं. आजी मामीला समजावत तिला घेऊन आत निघून गेली. आजोबा बाहेर त्याच्याजवळ थांबले. यशला आतमधून मामीच्या रडण्याचा, आजीच्या समजावण्याचा आवाज येत होता. तोही पुरता घामाने भिजून गेला होता. त्याला मान करून आजोबांकडे पाहण्याचीसुद्धा लाज वाटत होती. काही वेळाने आजीने यशला आतून हाक मारली. तो घाबरला, पण आत गेला. आजीने त्याला सणसणीत थप्पड दिली. “असा कसा रे वागलास तू?” आजीने रागारागाने विचारलं. यशच्या डोळ्यांतून पश्चातापाचे अश्रू वाहत होते. “आजी, मामी…मी मुद्दाम नाही केलं. मी…मी… मला काय करू हे सुचलं…नाही…मला मामीबद्दल रिस्पेक्ट आहे.” हुंदके देत देत तो बोलला खरा पण आजीने त्याला पुन्हा सुनावलं. “अरे कोणी बाई माणूस एकटी खोलीत असेल तर दरवाजा वाजवून आत जायचं आणि हे काही वाटेल तसं वागायला तुझं घर नाही हेही साधं कळत नाही का तुला? इतका कसा निर्लज्ज वागलास तू?” “काही कळत नाही की कळवून घ्यायचं नाही?”
नयना एव्हाना घरी आलेली होती आणि यशची वाट पाहत होती. यश एक तासाने घरी आला. आईला दारात पाहून त्याला पुन्हा भरून आलं. तिच्या कुशीत शिरून त्याने स्वतला मोकळं केलं. “आई, मी शपथ घेऊन सांगतो. मामीबद्दल माझ्या मनात काहीही नव्हतं. मला तिला तसं पाहून काहीही सुचलं नाही. मी फ्रीझ झालो.” हुंदके देत तो स्वतची बाजू मांडत होता. नयना त्याला समजावत होती खरी पण तीही या अनपेक्षित प्रकाराने हादरली होती आणि तिच्या माहेरच्या लोकांनी तिच्या मुलाबाबत केलेल्या टीकेमुळे प्रचंड दुखावली होती.
ती रात्र यशला समजावण्यात गेली, पण तो प्रचंड तणावात होता. त्या वेळीच तिने त्याच्यासाठी समुपदेशन घेण्याचं नक्की केलं आणि ती यशला घेऊन क्लिनिकला आली. यश त्या वेळीही शांत, मलूल बसून होता. एक प्रकारचा अपराधगंड त्याच्या चेहऱयावर आलेला होता. “यश, तुला माहीत आहे ना की तू चुकीचा नव्हतास. मग इतका त्रास कशाला करून घेतो आहेस?” असं विचारताच तो पटकन म्हणाला, “पण माझ्या आजीच्या नजरेतून मी उतरलोय ना?” आणि त्याच्या डोळ्यांतून पाणी आलं.
यश भरपूर संवेदनशील आणि भिडस्त असा मुलगा होता. त्याला दुनियेचे छक्केपंजेही माहीत नव्हते. अभ्यास, घर आणि आजोळ हेच त्याचं विश्व होतं. त्याचा स्वभाव त्याच्या घरी आणि आजोळी सगळ्यांना माहीत होता. तसंच तो एकुलता एक मुलगा, नातू असल्याने सगळ्यांचा लाडकाही होता. सगळे जण त्याला जपायचे, पण त्याला अशा जपण्यामुळे `स्वतला इतरांकडून गोंजारून घेण्याची सवय’ लागत चालली होती. नयनाचे यजमान हे कामानिमित्त बाहेरगावी असायचे. ती एकटीच यशला सांभाळत होती. त्यामुळे आपसूकच तिच्या माहेरच्या लोकांनीही यशला पहिल्यापासून सांभाळलं होतं. या सगळ्यामध्ये त्याची सारासार विवेकबुद्धी विकसितच होत नव्हती.
“खरंय तुमचं निदान” नयना म्हणाली. “मीच या सर्वाला कारणीभूत आहे. मी जर यशचे वाजवीपेक्षा लाड नसते केले तर तो निदान वेडय़ासारखा वागलाही नसता आणि काही गोष्टी गंभीरपणे घ्यायला हव्यातच हे समजून घेणं आवश्यक आहे.” यश आईच्या बोलण्याकडे लक्ष देऊन ऐकत होता. तोही आता पुरता सावरला होताच.
आजची जेन झी तरुणाई आचारविचारांच्या बाबतीत स्वतंत्र आहे खरी, पण स्वतच्या मानसिक आरोग्याबाबत या पिढीने जास्तीत जास्त जागरूक राहण्याची गरज आहे. ही पिढी स्वतबाबतीत जागरूक आहे तशीच संवेदनशीलसुद्धा आहे. स्वतला काय हवं, कशा प्रकारे हवं याबाबतीत तिचे ठोस विचार आहेत, पण त्याचबरोबर नकार पचविण्याची क्षमता या पिढीमध्ये दुर्दैवाने कमी आहे, स्वतमध्ये नको तेवढी गुरफटलेली आहे आणि यामुळेच आताची जेन झी तरुणाई नैराश्यात जाऊन पटकन नको ती पावलेही उचलते.
यश या पिढीचाच प्रतिनिधी आहे. त्यामुळे त्याच्याकडून झालेल्या चुकीला तो स्वतच माफ करू शकत नव्हता. त्याने स्वतचा झालेला अपमान हा इतका मनाला लावून घेतला होता की, त्यामुळे स्वतचं मानसिक स्वास्थ्य गमावण्याची त्याच्यावर वेळ आली होती. मात्र त्याच्या आईने वेळीच परिस्थिती ओळखून ठोस पावलं उचलली आणि त्याला समुपदेशनासाठी घेऊन आली.
यशच्या विस्तारित तसंच विवेकी दृष्टिकोनासाठीसुद्धा काही सत्र घेतली गेली, ज्यामध्ये त्याला त्याच्यापुढची वैयक्तिक, नातेसंबंधातली आणि करीअरमध्ये येणाऱया आव्हानांना सामोरं जाण्यासाठी स्वतला सक्षम कसं बनवायचं हेही सांगितलं गेलं. यशला या गोष्टी समजत होत्या, पण त्याला स्वतच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडायलाही थोडा वेळ लागला. म्हणजेच थोडी परिपक्वता, कोषातून बाहेर येणं, झालेल्या टीकेचा सकारात्मक विचार करणं हे सगळं त्याला सुरुवातीला अवघड गेलं खरं, पण हळूहळू त्याच्यात बदल व्हायला लागला. त्याने पुन्हा एकदा त्याच्या मामीची आणि आजीची माफी मागितली. त्यांनीही त्याला पटकन माफ केलं. शेवटी त्यांचा तो लाडोबा होता. नयनासुद्धा आता खूश होती कारण तिचा मुलगा सक्षम होत होता.
(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)



























































