
अक्षर
वैचारिक वाचनीय साहित्य देणारा अंक ही ‘अक्षर’ दिवाळी अंकाची ओळख. यंदा ‘युद्धकांड’ हा विशेष विभाग अंकात असून महत्त्वाचा विचार मांडणारे लेख यात आहेत. या विभागाचे संपादन ज्येष्ठ पत्रकार निळू दामले यांनी केले आहे. सुबोध जावडेकर यांचा ‘युद्ध आपल्या रक्तातच आहे?’, लोकेश शेवडे यांचा ‘न घडलेल्या युद्धाची हकिकत’, पंकज फणसे यांचा ‘उद्याचं युद्ध सायबर युद्ध’ हे लेख आणि संपूर्ण लेखमाला वाचनीय ठरली आहे. दर्जेदार कथा आणि कवितांनी अंक नटला आहे. बानू मुश्ताक यांची अनुवादित कथा ‘घरच्या अंगणात रक्त‘ हे या विभागाचे वैशिष्टय़ आहे, तर आजच्या पिढीची लेखिका हिना कौसर खान यांची स्पर्श ही कथा नक्की वाचावी अशी. सिने अभ्यासक रेखा देशपांडे यांचा ‘बेनेगलांच्या नायिका’, नीरज हातेकर यांचा ‘महाराष्ट्राची आर्थिक घसरगुंडी’ हे लेख अभ्यासपूर्ण ठरले आहेत. एकूण संपूर्ण अंक वाचनीय आणि तितकाच दर्जेदार आहे. सकस लेखन आणि वाचन घडवणारा असा हा अंक आहे.
संपादक ः मीना कर्णिक, हेमंत कर्णिक
पृष्ठ ः 242, मूल्य ः रु. 400/-
अक्षर संवेदना
‘अक्षर संवेदना’ दिवाळी अंकाचे यंदाचे हे 30 वे वर्ष. या वर्षी विविध क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींचा परिचय आणि त्यांच्या मुलाखती या अंकात आहेत. शाहरूख खान, अनुपम खेर, काजोल, महेश मांजरेकर, मुक्ता बर्वे अशा दिग्गज कलाकारांविषयी जाणून घ्यायला वाचकांना नक्की आवडेल. गझल नवाझ भीमराव पांचाळे यांच्यावरील विशेष लेख वाचनीय आहे. शरद कुलकर्णी, मेघना साने यांचा एव्हरेस्ट चढून जाणारे भारतातील पहिले ज्येष्ठ नागरिक, डॉ. रमेश साळुंतसेच ‘आरक्षित भूखंडावरील बांधकाम’ या महत्त्वाच्या विषयाबाबत भूमिका मांडणारा लेख आहे. मेघना साने, चंद्रकांत बर्वे, डॉ. रमेश साळुंखे यांचे विशेष लेख, एस. पी. खेडेकर यांची कथा, सिसिलिया कार्व्हालो, प्रतिभा सराफ यांच्या कविता वाचकांना आवडणाऱया आहेत. लोककला, संगीत, पर्यटन अशा सर्व विषयांचा अंतर्भाव असलेला हा दिवाळी अंक संग्राह्य झाला आहे.
संपादक ः दीपक शेडगे
पृष्ठ ः 150, मूल्य ः रु. 250/-
अर्थशक्ती
बँकिंग, विमा, गुंतवणूक अशा महत्त्वाच्या विषयांना वाहिलेल्या ‘अर्थशक्ती’ दिवाळी अंकाचे हे 11 वे वर्ष. सुबक, सुटसुटीत मांडणी आणि उत्कृष्ट छपाई यामुळे अंक छाप पाडतो. या अंकात अनेक मान्यवर अर्थतज्ञांचे लेख आहेत. आरबीआय राष्ट्रसेवेची 90 वर्षे, एकात्मक बॅकिंग लोकपाल योजना, वित्तीय समावेशन, डेटा म्युच्युअल फंड, गोल्ड लोन नवे नियम, विकसित भारत, पेमेंट सुरक्षा असे अनेक महत्त्वाचे विषय लेखाद्वारे देण्यात आले आहेत. डॉ. आशुतोष रारावीकर, विनायक कुलकर्णी, वंदना धर्माधिकारी, राजीव जोशी, अरविंद परांजपे, आनंद पोफळे, मुकुंद अभ्यंकर, रोहीत गायकवाड या अर्थविषयक लेखकांचे महत्त्वाचे लेख आहेत, तसेच राम मांडुरके, अरविंद गाडेकर यांच्या अर्थविषयक व्यंगचित्रांचे दालन आहे. सध्याच्या काळाला अनुरूप असे दर्जेदार लेख, विषय असणारा वाचनीय असा हा अंक आहे.
संपादक ः रमेश नार्वेकर
पृष्ठ ः 148, मूल्य ः 100 रुपये
‘जॉय’ दिवाळी अंक
जॉय ऑफ गिव्हिंग या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून यंदा प्रथमतःच प्रकाशित करण्यात आलेला हा दिवाळी अंक सुंदर, वाचनीय बनलेला आहे. अंकामध्ये डॉ. संजय लाटकर यांनी समजावलेले मानसिक आरोग्याचे महत्त्व, मनीष वाघ यांचा लोकशाहीचे शुद्धीकरण, लीना बल्लाळ यांचा समाजातील व्यसनाधीनता, असूंता डिसोझा यांचा एकाग्रता, सचिन परांजपे यांचा वृद्धाश्रम, नवी यातना केंद्रे, राजेंद्र चौधरी यांचा मोबाईल एक श्वास, उल्हास देव्हारे यांचा विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कार, भारती सावंत यांचा पाऊस पडला नाही तर हे नामवंत लेखकांचे लेख वाचनीय आणि बोधपर झालेले आहेत. अनंत बोरसे लिखित देवभूमी उत्तराखंड, कमलाकर जाधव यांचा प्रवासातील फटफजिती, वैभव पाटील यांचा अध्यात्म आणि निसर्ग, हे लेखदेखील उत्कृष्ट आणि माहितीपूर्ण आहेत. अद्वितीय संशोधक डॉ. प. वि. वर्तक हा मनमोहन रोगे यांचा व्यक्तिविशेष लेखही आहे.
संपादक ः वैभव पाटील
पृष्ठ ः 101, मूल्य ः 300 रुपये
            
		





































    
    






















