आरोग्य – चक्कर येणेः रोग नव्हे लक्षण

>> डॉ. आशुतोष कुलकर्णी

चक्कर येणे हा रोग नसून एक लक्षण आहे. त्यामुळे अनेक प्रकारच्या व्याधी, रुग्णाची स्थिती ओळखता येऊ शकते. जसे की, ताप आला तर कुठल्या कारणामुळे आला हे शोधून औषधे द्यावी लागतात, त्याप्रमाणे चक्कर येण्याचे कारण शोधून काढणे आवश्यक आहे.

चक्कर येणे (Vertigo) हे लक्षण रुग्णांमध्ये वाढते आहे. भोवऱयाप्रमाणे गोल फिरल्यासारखे  हे लक्षण मुख्यतः  आढळते. अशा वेळी खरोखर शरीराची हालचाल होतेच असे नाही, पण खाली पडल्यासारखे वाटते.

चक्कर येण्याचे अनेक प्रकार आहेत. उदाहरणार्थ तोल जाणे,  पुढच्या किंवा मागच्या बाजूस पडणे, जमिनीवर लोळण घेणे इत्यादी. अशा वेळी रुग्णाला डोळ्यांनी बघताना त्रास होतो. काही रुग्ण आपले डोळे गच्च मिटून घेतात. अत्यंत घाम येणे, उलटीची भावना होणे, मळमळ ही लक्षणे प्रामुख्याने दिसतात.

चक्कर काही मिनिटे राहते किंवा काही दिवसांपर्यंत राहू शकते. जसे कारण असेल तसा त्याचा कालावधी कमी जास्त असतो. चक्कर येणे हा रोग नसून एक लक्षण आहे. त्यामुळे अनेक प्रकारच्या व्याधी, रुग्णाची स्थिती ओळखता येऊ शकते. जसे की, ताप आला तर कुठल्या कारणामुळे आला हे शोधून औषधे द्यावी लागतात, त्याप्रमाणे चक्कर येण्याचे कारण शोधून काढणे आवश्यक आहे. ती कशी हे पुढे पाहू या.

कानाचे विकार  

कानाच्या आजारांमध्ये बहुतांशी चक्कर हे प्रमुख लक्षण असते. उदाहरणार्थ, आतील कानात माळ साठणे. त्यामुळे किंवा जंतुसंसर्गामुळे आतील पडद्याजवळ येणारी सूज, त्यामुळे कानातील अवयव मेंदूकडे चुकीचे सिग्नल्स पाठवतो व चक्कर येणे सुरू होते.

कानाची काळजी न घेता  पोहण्याने कानात पाणी जाऊन कानातील मळ फुगणे हे चक्कर येण्याचे कारण होऊ शकते. तेव्हा पोहताना योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.

कानावर आघात झाल्यास चक्कर येण्याचे प्रमाण वाढते.

आतील कानावर आघात होण्यास अॅस्पिरिनसारखी औषधे, काही मूत्रल औषधे, केमोथेरपी करणारी औषधे, काही अॅंटिबायोटिक्स कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे चक्कर येण्याचे प्रमाण वाढते.

मेंदू विकार

अर्धशिशी, मायग्रेन, मेंदूतील रक्तस्राव, टय़ुमर, मानसिक आजार (सायकॉलॉजिकल प्रॉब्लेम) कानाकडे येणाऱया मेंदूच्या नसांचे विकार, विषाणूजन्य अथवा जिवाणूजन्य संसर्ग, अॅलर्जी, मल्टिपल स्लेरोसिस इत्यादी अनेक कारणांनी चक्कर येण्याचे प्रमाण वाढते

मानेमधील शिरेस आघात होणे- मानेतील शिरेवर दाब आल्यास मेंदूला मानेकडून तोल सांभाळण्याचे मिळणारे आवश्यक ज्ञान होत नाही. त्यामुळे चक्कर येणे सुरू होते. उदाहरणार्थ, मानेतील मांसपेशींना येणारी सूज हे सध्या चक्कर येण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण आहे.

अगदी तरुणाईपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांना अशी चक्कर येण्याचे प्रमाण वाढत आहे. मोबाइल, लॅपटॉपच्या अति वापरामुळे हा त्रास वाढला आहे. कमी अथवा अधिक रक्तदाब तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने चक्कर येणे शक्य आहे.

सामान्यत मेंदू आतला कान, डोळे आणि त्वचा इत्यादीद्वारे भोवताली असलेल्या परिस्थितीचा अंदाज घेतो. त्यातील एखाद्या अवयवाच्या बिघाडाने चक्कर येणे सुरू होते. कानातील आतला भाग, उदाहरणार्थ  शंखाकृती हाडांच्या विकृतीमुळे चक्कर येते.

मेंदूतून निघणाऱया ऐकू येण्याचे काम करणाऱया नसांच्या  बिघाडामुळे चक्कर येऊ शकते. मेंदूपासून निघालेल्या मज्जारज्जूवर  अथवा लहान मेंदूवर काही विकृतीजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास चक्कर येण्याचे प्रमाण वाढते. मानसिक ताणामुळे चक्कर येण्याचे प्रमाण वाढते अथवा मोकळ्या, उंच जागेची भीती वाटून चक्कर येण्याचे प्रमाण वाढते.

अचानक डोक्याची जोरात हालचाल केल्यामुळे चक्कर येते हे प्रमुख व रोजच्या व्यवहारात आढळणारे चक्कर येण्याचे कारण आहे. याचा त्रास पुरुषांपेक्षा स्त्रियांना दुप्पट आढळून येतो. हा चक्कर येण्याचा  प्रकार तसा त्रासदायक नाही तसेच त्याचे कारणही पटकन शोधून काढता येत नाही, परंतु वयोमानानुसार अथवा डोक्याला मार लागला असल्यास त्याची तपासणी जरूर करावी.

ही चक्कर फार थोडय़ा वेळापुरती येते. त्यामध्ये तात्पुरती बेशुद्ध अवस्था, डोके हलके वाटणे, तोल जाणे आधी किंवा मळमळ इत्यादी लक्षणे आढळतात. डोक्याची हालचाल चटकन झाल्यास एखाद्या वेळेस उलटी होण्याची संभव असतो. अंथरुणात लोळून कूस बदलणे, झटकन खाली वाकणे, उभे असताना वर बघणे इत्यादीमुळे चक्कर येते. अशा वेळी डोळ्यांच्या बुबुळांची जोरात हालचाल होते. या हालचाली बघून डॉक्टर रोगनिदान करू शकतात.

अर्धशिशीमुळे  येणारी चक्कर

अर्धे डोकं दुखल्यामुळे अत्याधिक वेदनेने चक्कर येऊ शकते.

त्याचबरोबर डोके दुखत नसतानाही कधी कधी अतीव श्रमाने चक्कर येण्याचा त्रास होऊ शकतो.

अत्याधिक प्रमाणात उन्हाळय़ामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन चक्कर येऊ शकते.

कोणती पथ्ये पाळावीत

आहारातील मिठाचे प्रमाण कमी करावे. मूत्र प्रवृत्ती वाढण्यासाठी डाययुरेटिक्स औषधे चालू असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कानातून आवाज येत असल्यास आपल्या फॅमिली डॉक्टरचा सल्ला घेऊन त्यानंतर कान-नावöघसा तज्ञांचा सल्ला घ्यावा. चक्कर न येण्यासाठी आवश्यक आहार भरपूर जीवनसत्त्वं असलेला, पित्तशामक असा असावा. ऋतूनुसार योग्य प्रमाणात पाणी पिणे आवश्यक आहे. मोबाइल, लॅपटॉपचा वापर जरुरीपुरता करावा. मध्ये मध्ये विश्रांती घ्यावी. हात, मान, खांद्यांचा हलका व्यायाम करावा.

आयुर्वेदामधील अनेक औषधे चक्कर येण्याच्या लक्षणांना दूर करण्यासाठी उपयुक्त ठरली आहेत. त्यामध्ये सूतशेखर, पित्तशामक काढे, ऋतूनुसार विरेचन, बस्ती अशी पंचकर्मे, सुंठ इत्यादीसारखी औषधे उपयुक्त ठरली आहेत.

उपचार 

चक्कर येण्याचे योग्य व लवकर निदान करून उपचार करणे गरजेचे आहे. घरगुती उपचार करत बसू नये. आपल्या फॅमिली डॉक्टरचा सल्ला घ्यावा.

बीपीपीव्ही व काही चक्कर येण्याचे प्रकार बाह्यतः निरुपद्रवी दिसतात, परंतु त्यांचे उग्र अवस्थेत रूपांतर होण्याआधीच त्यांचे कारण समजणे आवश्यक आहे.

बीपीपीव्ही या चक्कर येणाऱया रुग्णांना ठरावीक प्रमाणात व्यायाम, योगासनांचा भरपूर फायदा होतो. रुग्णांनी शवासनाच्या स्थितीत झोपून डोके दोन्ही बाजूस हळूहळू हलवावे. प्रत्येक बाजूस डोके 20 सेकंद ठेवावे. त्यामुळे चक्कर येण्याचे प्रमाण कमी होते.

[email protected]