
>>ज्ञानेश्वर गावडे<<
ऑस्ट्रेलियासारखा मोठा देश (77 लाख चौरस किलोमीटर) गेली दोन वर्षे दुष्काळाशी सामना करीत आहे. त्यातून सद्भाग्य हे की, त्यांची 90 टक्के वस्ती समुद्राच्या जवळपासची आहे, तर देशांतर्गत जमीन ओसाड व वालुकामय म्हणजे सुकी आहे. मुळात ऑस्ट्रेलियात 17 व्या शतकापर्यंत मूळचे आदिवासी सोडले तर युरोप, अमेरिकेतून आलेली मंडळीच वस्तीला आहेत. सध्या मात्र जगातील सर्व देशांतून आलेले लोक असल्यामुळे ऑस्ट्रेलियातील सध्याचा अपूर्व दुष्काळ जगभरचा चिंतेचा विषय झालेला आहे. ऑस्ट्रेलियात आलेल्या लोकांनी तेथील जंगले कमी केली आणि वस्ती वाढविली. त्याचा राग तेथील निसर्ग सध्या ऑस्ट्रेलियावर काढीत आहे. 2000 मध्ये ऑस्ट्रेलियात भयंकर दुष्काळ पडला होता. त्याचा परिणाम अजूनही जाणवत आहे. ऑस्ट्रेलियासारखेच जगभरातील डझनभर देश दुष्काळाशी सध्या सामना देत आहेत. अलीकडच्या 15 वर्षांत वणव्याच्या घटनांमध्ये 158 टक्के वाढ झालेली आहे. परिणामी हिवाळय़ातदेखील तापमानात वाढ झाल्याची नोंद आहे. आफ्रिका खंडातील इथिओपिया या देशातील दुष्काळाची स्थिती 2015 पासून चालू आहे. त्या देशातील सुमारे 85 लाख लोक अक्षरशः उपासमारीच्या खाईत आहेत. दक्षिण आफ्रिकेतील एक शहर केपटाऊनची पिण्याची पाण्यासाठी इतकी दयनीय अवस्था आहे की, काही दिवसांपूर्वीच या शहराचा पेयजलाचा पुरवठा पाण्याअभावी पूर्णपणे थांबवावा लागला. आपल्याकडील बंगळुरू शहराची हालतही अशीच होणार असून जवळच्या चेन्नई शहराला दिवसाआड पेयजलाचा पुरवठा होत आहे. युरोप खंडातील बर्फाळ भागातही वाढत्या उष्ण तापमानामुळे आजपर्यंत कधी नव्हे ते गरम वातावरण अनुभवास येत आहे. ग्रीस, डेन्मार्क, फ्रान्स अशा देशांनाही कमी पावसामुळे पाण्याची टंचाई जाणवत आहे. बर्फाचे थर वितळूनही पाणीटंचाई आहेच, गरम वातावरणामुळे जंगलांनाही आगी लागत आहेत. स्पेनच्या जंगलातील अशीच आग कित्येक दिवस झाले तरी विझत नाही. कॅनडा व अमेरिकेतील जंगलेही अशीच दीर्घकाळ विझत नाहीत. वसुंधरेची शीतलता कमी होऊन उष्णतामान वाढत आहे. परिणामी दुष्काळी भागांची संख्या वाढत आहे. पाणीटंचाई वाढत आहे. जगातील सगळय़ांनीच यावर गंभीर झाले पाहिजे.


























































