राज्यस्तरीय ज्ञानेश्वरी लेखी स्पर्धेचा निकाल जाहीर; विभागात निफाडचे विद्यार्थी अव्वल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाशिकच्या किरणदेवी सारडा सत्कार्य निधी संस्थेच्या वतीने आयोजित मामासाहेब दांडेकर राज्यस्तरीय ज्ञानेश्वरी लेखी स्पर्धा – 2019 चे निकाल जाहीर झाले आहेत. नाशिक विभागात सोळा वर्षाखालील मुलांच्या गटात निफाडच्या संकेत चाबुकस्वारने, तर मुलींच्या गटात सोनाली कमानकरने प्रथम क्रमांक पटकाविला.

सन 1996 पासून ही राज्यस्तरीय ज्ञानेश्वरी लेखी परीक्षा घेतली जात असून, दरवर्षी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मागील वर्षापासून ट्रस्टने अमरावती, कोकण, नागपूर, नाशिक, संभाजीनगर व पुणे अशा सहा विभागात परीक्षा घेतल्या. सर्व जिल्ह्यांमधून उत्तम प्रतिसादही मिळाला. प्रत्येक विभागात सोळा वर्षाआतील व सोळा ते पंचवीस वयोगटातील मुले व मुली अशा गटात ही परीक्षा पार पडली. यात प्रथम ते तृतीय अशी एकूण 52 हजार 500 रुपयांची रोख पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत.

नाशिक विभागात सोळा वर्षाआतील मुलांच्या गटात निफाड केंद्रातील संकेत विष्णू चाबुकस्वार व मुलींच्या गटात सोनाली तुकाराम कमानकर यांनी प्रथम, तर द्वितीय क्रमांक जळगावचा जयेश चंद्रकांत तायडे व निफाडची साक्षी शांताराम पवार यांनी मिळवला.

सोळा वर्षाआतील गटात अमरावती विभागात जयेश खोंड, इशिका आरेवार; नागपूर विभागात अमन शेख, धनश्री खुने विजेते ठरले. पुढील गटात अमरावती विभागातून प्रणव सावरकर, तन्वी अढाऊ; नागपूरमधून अनुसंग वासनिक आणि जान्हवी कुमोटी यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.