चाहत्यांनो, आमची साथ सोडू नका!

61

सामना ऑनलाईन । लंडन

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेत सलग दोन सामने गमावल्यानंतर ‘टीम इंडिया’चा कर्णधार विराट कोहलीने चाहत्यांना साथ न सोडण्याची साद घातली आहे. आपल्या अधिकृत फेसबुक पेजवरून त्याने हे भावनिक आवाहन केले.

विराट कोहलीने फेसबुक पेजकरून एक फोटो आणि संदेश पोस्ट केला आहे. या संदेशात त्याने म्हटले की, आम्ही काही वेळा जिंकतो, तर काही वेळा पराभूत होतो. पण आम्ही जेव्हा पराभूत होतो तेव्हा आम्ही त्यातून खूप काही शिकण्याचा प्रयत्न करत असतो. आम्ही उर्वरित सामन्यांमध्ये नक्कीच चांगली कामगिरी करू असा विश्वास आहे. तुम्ही आमच्याकर विश्वास ठेवा. त्यामुळे चाहत्यांनो, तुम्ही आमची साथ सोडू नका अशी भावनिक साद विराटने घातली आहे.

बुमराह, अश्विन, पंडय़ा फिट

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेत सलग दोन पराभवामुळे ‘टीम इंडिया’ पाच सामन्यांच्या मालिकेत 0-2 फरकाने पिछाडीवर पडली आहे. त्यामुळे तिसऱया कसोटीसाठी हिंदुस्थानी संघात अनेक बदल होण्याची शक्यता आहे. अंगठय़ाच्या दुखापतीतून सावरलेला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला संघात स्थान मिळणे जवळपास नक्की आहे. तो लॉर्डस् कसोटीपूर्वीच फिट झाला होता, पण उगाच धोका नको म्हणून बुमराहला खेळवले नव्हते. कुलदीप यादवच्या जागेवर बुमराहला संधी मिळेल. रविचंद्रन अश्विन आणि हार्दिक पंडय़ा यांनाही फिट घोषित करण्यात आले आहे. या दोघांना लॉर्डस्वरील दुसऱया कसोटीत फलंदाजी करताना बोटाला चेंडू लागून दुखापत झाली होती.

पंतला पदार्पणाची संधी?

यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकही दोन्ही कसोटीत फ्लॉप ठरला. वृद्धिमान साहा जायबंदी असल्यामुळे त्याला संधी मिळाली होती. त्यामुळे कार्तिकच्या जागेवर युवा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतला कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळू शकते. पंतने ‘आयपीएल’ आणि इंग्लंड दौऱयावर हिंदुस्थान ‘अ’ संघाकडून प्रभावी फलंदाजी केली होती. मधल्या फळीत करुण नायर आणि आघाडीचा फलंदाज शिखर धवनला संधी मिळते काय हे पाहणेही रंजक ठरणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या