
झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवामुळे सुपर एटच्या शर्यतीत मागे पडलेल्या बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघाची धाकधूक वाढली आहे. टी-20 वर्ल्ड कपच्या मृत्यू गट असलेल्या ‘ब’ गटातील आव्हान जिवंत राखण्यासाठी ऑस्ट्रेलियाला श्रीलंकेविरुद्ध करो या मरो ध्येयानेच लढावे लागणार आहे. हरले तर त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येऊ शकते आणि जिंकले तर त्यांना सुपर एटमध्ये धडक मारण्याची संधी कायम असेल. म्हणजेच या लढतीत जो जिंकेल तोच टिकेल.
झिम्बाब्वेविरुद्धच्या धक्कादायक पराभवाने ट्रव्हिस हेडच्या संघाची कोंडी केली आहे. स्पर्धेचे दावेदार मानल्या गेलेल्या कांगारूंना आता चक्क स्वतःचे अस्तित्व वाचवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. त्यामुळे श्रीलंकेविरुद्ध हेडकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, टिम डेव्हिड आणि कॅमेरून ग्रीन यांची फटकेबाजी सामना क्षणार्धात फिरवू शकते, पण दबावाखाली लक्ष्याचा पाठलाग करताना होणाऱया घसरणीमुळे ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या संयमावर प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे.
दुसरीकडे, श्रीलंका प्रचंड आत्मविश्वासात आहे. सलग दोन दमदार विजयांनी दासुन शनाकाचा संघ गटात अव्वल स्थानावर पोहोचला आहे. आणखी एक विजय म्हणजे त्यांचे सुपर एटचे तिकीट जवळजवळ पक्के होईल. पुसल मेंडिसने जबाबदारीने डाव सावरला आहे, तर पथुम निसंकाची सातत्यपूर्ण सुरुवात भक्कम पाया घालते. गोलंदाजीत मधल्या षटकांत महेश तीक्षणाचे नियंत्रण निर्णायक ठरू शकते, विशेषतः फिरकीला मदत करणाऱया खेळपट्टीवर तो करामात दाखवू शकतो.
पाल्लेकेलेची सपाट खेळपट्टी आणि वेगवान आऊटफिल्ड धावांचा वर्षाव करू शकतात; मात्र मोठय़ा सीमारेषा आणि फिरकीला मिळणारी पकड यामुळे रणनीती महत्त्वाची ठरणार आहे. अलीकडे येथे पाठलाग करणाऱया संघांना यश मिळाले असल्याने नाणेफेक निर्णायक ठरू शकते. इतिहास ऑस्ट्रेलियाच्या बाजूने आहे. त्यांनी 14 पैकी 12 विजय मिळवलेत, पण दोन्ही पराभव श्रीलंकेच्या भूमीवर झाले आहेत. त्यामुळे घरचा फायदा सिंहलींना धैर्य देत आहे.



























































