
ऑस्ट्रेलियाविरुद्ध विक्रमी धावसंख्या उभारूनही पराभवाची नामुष्की पत्करावी लागलेल्या इंग्लंडपुढे चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत उद्या डार्क हॉस समजल्या जाणाऱ्या अफगाणिस्तानचे आव्हान असेल. उभय संघांना सलामीच्या लढतीत पराभव पत्करावा लागलाय. त्यामुळे ‘जिंका नाहीतर बॅगा भरा’ अशी अवस्था असलेली ही ‘ब’ गटातील लढत म्हणजे इंग्लंड व अफगाणिस्तान या दोन्ही संघांसाठी अस्तित्वाची लढाई असेल. तसेच ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेतील लढत पावसामुळे भिजल्यामुळे उपांत्य फेरीतील दोन संघांचा फैसला शेवटच्या साखळी लढतीनंतर लागणार हे स्पष्ट झाले आहे.
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील इंग्लंडचा दबदबा आता इतिहासजमा झालाय. ऑस्ट्रेलियाविरूद्ध त्यांनी 350 धावांचा टप्पा गाठला होता. तसेच ऑस्ट्रेलियाचे प्रमुख गोलंदाज या स्पर्धेत खेळत नाहीत हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे इंग्लंडला फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही आघाडय़ांवर सरस कामगिरी करावी लागणार आहे. उद्याच्या लढतीत इंग्लंडचे पारडे जरी जड असले, तरी अफगाणिस्तान त्यांचा दिवस असल्यास कुठल्याही संघाला हरवू शकतात हे त्यांनी अनेकदा दाखवून दिलेले आहे. त्यामुळे इंग्लंडसाठी उपांत्य फेरीची वाट तशी सोपी नसेल.
लाहोरची खेळपट्टी फिरकीला अनुकूल!
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आधी हिंदुस्थानविरुद्धच्या वन डे मालिकेत इंग्लंडच्या फलंदाजांची फिरकीला सामोरे जाताना दमछाक झाली होती. अफगाणिस्तानकडे तर राशीद खान, नूर अहमद व मोहम्मद नबी असे धोकादायक फिरकी गोलंदाज आहेत. त्यामुळे इंग्लंडच्या फलंदाजीचाही कस लागणार आहे. कारण लाहोरची खेळपट्टी ही फिरकीसाठी अनुकूल असेल असा अंदाज आहे. त्यातच अष्टपैलू ब्रायन कार्सला दुखापत झाल्याने इंग्लंडला धक्का बसलाय. त्याच्या जागेवर फिरकीपटू रेहान अहमदला स्थान देण्यात आले आहे. आदिल राशीद व लियाम लिव्हिंगस्टोन हे इतर दोन फिरकी गोलंदाज इंग्लंडच्या दिमतीला असतील.