नाशकात मुथूट फायनान्समध्ये भरदिवसा सशस्त्र दरोडा

सामना प्रतिनिधी । नाशिक

नाशिकच्या उंटवाडी येथील मुथूट फायनान्सच्या कार्यालयात आज सकाळी सशस्त्र दरोडा पडला.  दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात कंपनीचा ऑडिटर ठार झाला तर दुसरा ऑडिटर जखमी झाला.

उंटवाडीसमोर सिटी सेंटर मॉलजवळील मधुरा टॉवर्स या इमारतीत अगदी गजबजलेल्या भागात मुथूट फायनान्सचे कार्यालय आहे. सकाळी साडेअकरा-पावणेबाराच्या सुमारास तोंडाला काळे स्कार्प बांधून आलेल्या पाच तरुणांनी फायनान्सच्या कार्यालयात प्रवेश केला. अधिकारी, कर्मचार्‍यांना धमकी देत मोबाईल ताब्यात घेतले. एका कर्मचार्‍याने प्रसंगावधान राखून सायरन सुरू केला. त्यावर दरोडेखोरांनी ऑडिटर साजू सॅम्युयल यांच्यावर तीन गोळय़ा झाडल्या. त्यात ते ठार झाले. दुसरे ऑडिटर कैलास जयन, मॅनेजर चंद्रशेखर देशपांडे यांना दरोडेखोरांनी मारहाण केली. दरम्यान, फायनान्स कार्यालयासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेऊन संशयितांचा शोध सुरू केला आहे.