कोरोनाशी लढायचेय, घाबरायचे नाही! देशातील तज्ञ डॉक्टरांचा नागरिकांना सल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑक्सिजन, रेमडेसिवीर हा केवळ एक उपचार आहे. पण कोरोनावर मात करण्यासाठी फक्त तोच उपचार नाही हेसुद्धा ध्यानात घ्या. रेमडेसिवीर म्हणजे काही जादूची कांडी नव्हे. ऑक्सिजन हेसुद्धा एक औषध आहे. पॉझिटिव्ह आलेल्या प्रत्येकाला रुग्णालयात दाखल व्हावे लागते असेही नाही.

बहुतांश लोकं असे आहेत ज्यांना कोणत्याही विशेष उपचारांची गरज नसून केवळ घाबरल्यामुळे ते आयसोलेट झाले आहेत किंवा रुग्णालयात भरती झाले आहेत. अशी वस्तुस्थिती सांगतानाच ‘कोरोनाशी लढायचेय, घाबरायचे नाही’ असा सल्ला देशातील तज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.

पॉझिटिव्ह झाल्यास घाबरू नका, सौम्य लक्षणे असल्यास घरीच उपचार

कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास घाबरण्याची काही गरज नाही. कोणतीही लक्षणे नसलेले पिंवा हलकी लक्षणे असणाऱयांवर घरीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेता येणे शक्य असते.

रुग्णाची ऑक्सिजन पातळी 95 च्या खाली नसेल तर त्याला रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही. मात्र जर उलटय़ा आणि जुलाब जास्त होत असतील तर अशा रुग्णाला रुग्णालयात दाखल करावे लागते. रेमडेसिवीर इंजेक्शनची रुग्णांसाठी मार्गदर्शक तत्त्वे आहेत. छातीच्या सीटी स्पॅनचा सीटी व्हॅल्यू 9 आल्यानंतर रुग्णाला रेमडेसिवीरचे इंजेक्शन देण्याचा निर्णय घ्यावा लागतो.
– डॉ. दीपक बैदमाजी अध्यक्ष, असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट

ऑक्सिजनचा वापर औषधासारखा, जपून व्हायला हवा!

कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या बहुतांश रुग्णांमध्ये सर्दी, घसा खवखवणे अशी साधारण लक्षणे असतात. पाच ते सात दिवसांमध्ये ती बरी होतात. 85 टक्के रुग्णांना तर रेमडेसिवीरसारख्या विशेष उपचारांची आवश्यकताच नसते. ऑक्सिजन हा एक उपचार आहे. त्याचा औषधासारखा वापर व्हायला हवा. आवश्यकता नसताना तसेच अतिरिक्त ऑक्सिजन देणे म्हणजे ऑक्सिजन वाया घालवल्यासारखे आहे. असे केल्याने रुग्णांना फायदा झाल्याचे अद्याप कुठेही सिद्ध झालेले नाही. त्याचप्रमाणे लस घेतल्याने कोरोनाची लागण होणार नाही असेही नाही. प्रतिबंधक लस ही आजाराला गंभीर होण्यापासून रोखते, संसर्गापासून नाही. त्यामुळे लस घेतल्यानंतरही मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले पाहिजे.
– डॉ. रणदीप गुलेरिया, संचालक, ‘एम्स’ रुग्णालय, दिल्ली

ऑक्सिजन वापराबद्दल प्रशिक्षण देण्याची गरज

सध्या कोरोनाच्या प्रत्येक रुग्णाला दाखल केल्यानंतर त्याला लगेच ऑक्सिजन लावला जातो. त्याच्या शरीरातील ऑक्सिजन लेव्हल 90 च्या खाली आली तर ऑक्सिजन लावावा लागतो. पण तत्पूर्वी ऑक्सिजन लेव्हल का खाली आली? त्याला काही हृदय किंवा किडनीविकार नाही ना? याची तपासणीही केली गेली पाहिजे. केवळ कोरोनामुळेच ऑक्सिजनची पातळी घसरते असे नाही. तसेच कोरोनाग्रस्त आला की त्याच्या शरीरातील ऑक्सिजनच्या पातळीवरून त्याला किती प्रमाणात ऑक्सिजन द्यायचा याचेही ज्ञान महत्वाचे आहे. कोविड सेंटरमध्ये काम करणाऱया डॉक्टर्स, कर्मचाऱयांना त्याचे विशेष प्रशिक्षण द्यायला हवे.
– डॉ. जयसिंह फडतरे, श्वसनविकार तज्ञ, शुश्रूषा रुग्णालय, मुंबई

कोरोनाच्या कमी रुग्णांना रुग्णालयात दाखल व्हावे लागते हे लक्षात घ्या!

कोरोना पॉझिटिव्ह आला म्हणजे रुग्णालयात भरती व्हायलाच हवे असे नाही. खूप कमी रुग्णांना ती गरज पडते. त्यामुळे रुग्णालयातील बेडचा वापर जबाबदारीने व्हायला हवा. प्रत्येक पॉझिटिव्ह रुग्णाला रेमडेसिवीर इंजेक्शन द्यायलाच पाहिजे असा सध्या ‘प्रोटोकॉल’च बनवला गेला आहे. चाचणी अहवाल, रुग्णामधील लक्षणे, त्याला पूर्वी असलेले आजार या बाबींचा विचार करूनच रेमडेसिवीर इंजेक्शन दिले पाहिजे. रेमडेसिवीर हा काही रामबाण उपाय नाही. त्याने फक्त व्हायरल लोड कमी होतो, आजार पूर्णपणे दूर होत नाही. ऑक्सिजनचेही तसेच आहे. गरज नसताना तो देऊ नका. ऑक्सिजन वाया घालवू नका. नाहीतर ज्यांना खरोखरच त्याची आवश्यकता आहे त्यांना तो वेळेवर मिळणार नाही.
– डॉ. नरेश त्रेहन मेदांता रुग्णालय, नवी दिल्ली