
व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन 31 वर्षीय तरुणीवर डॉक्टरकडून बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीनंतर विश्रामबाग पोलिसांनी संशयित डॉ. हर्ष राजेंद्र चोरारिया (वय 28, रा. मुंबई) याच्याविरुद्ध बलात्कार आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
संशयित डॉ. चोरारिया हा मूळचा मुंबई येथील राहणारा असून, गेल्या काही काळापासून तो सांगलीतील एका नामवंत हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत आहे. ऑक्टोबर 2024 पासून त्याने वेळोवेळी पीडितेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून 29 डिसेंबर 2024 ते 11 जानेवारी 2025 या काळात वेळोवेळी पीडितेला सांगली शहरातील कोल्हापूर रोडवरील एका हॉटेलवर नेऊन व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार अत्याचार केले. याप्रकरणी पीडितेने मंगळवारी सायंकाळी फिर्याद दिली असून, पोलिसांनी संशयित डॉ. चोरारिया याच्याविरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा अधिक तपास विश्रामबाग पोलीस करीत आहेत.