
रिकाम्या पलंगावर आराम करणाऱया रुग्णाला डॉक्टरने ‘तू’ म्हणून बोलल्यावरून झालेल्या वादातून दोघांमध्ये वॉर्डमध्येच हाणामारी झाली. हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून संबंधित डॉक्टरला निलंबित करण्याची मागणी करत रुग्णाच्या नातेवाईकांनी तीव्र निदर्शने केली.
अर्जुन पंवार हे रुग्णालयात आज सकाळी एंडोस्कोपीसाठी गेले होते. 11 वाजता एंडोस्कोपी झाल्यानंतर त्यांना दुसऱया वॉर्डमध्ये आराम करण्यास सांगण्यात आले. त्यामुळे ते सोबत आलेल्या नातेवाईकासह छातीच्या ओपीडीच्या वॉर्डमध्ये गेले आणि तेथे एक रिकामा बेड पाहून तेथे झोपले. त्याचवेळी एक डॉक्टर तेथे आले आणि त्यांनी पंवार यांना ‘तू इथे कसा आला?’ असा एकेरी उल्लेख करत चिडून बोलायला लागले. पंवार यांनी त्यांना एंडोस्कोपी झाल्याची माहिती दिली, मात्र त्या डॉक्टरने उद्धटपणे बोलणे सुरूच ठेवले. एकेरी भाषेत बोलू नको, असे पंवार यांनी म्हणताच डॉक्टरने त्यांना मारहाण करण्यास सुरू केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि राज्यातील आरोग्य यंत्रणा हादरली.
डॉक्टरचे निलंबन, चौकशी सुरू
रुग्णाच्या नातेवाईकांनी तीव्र निदर्शने केल्यानंतर डॉ. राघव नरुला यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.


























































