
जे.डी. पराडकर । देवरुख
संगमेश्वर तालुक्यात यापूर्वी डुक्कर आणि बिबट्या यांच्या झुंजीचा थरार अनेकांनी पाहिला आहे. मात्र कुत्रा आणि बिबट्या यांच्या झुंजीचा थरार म्हणजे आश्चर्य वाटण्यासारखा प्रसंग आहे. देवरुख येथील ठेकेदार सुरेंद्र देसाई यांच्या लॅब्रेडॉर जातीच्या गोल्डी नामक कुत्र्याने घराच्या परिसरात मध्यरात्री बिबट्याजवळ कडवी झुंज देवून त्याला पळवून लावले आणि गोल्डीने आपण शेरास सव्वा शेर असल्याची म्हण सिध्द केली .
कोकण परिसरात बिबट्यांचे मानवी वस्तीत शिरणं हे काही नवीन राहीलेलं नाही. मानवी वस्तीत शिरुन मांजरे, कोंबड्या आणि पाळीवसह भटक्या कुत्र्यांवर ताव मारणे हे मानवासह बिबट्यांसाठी नित्याचेच झाले आहे. पाळीव अथवा भटकी कुत्री बिबट्याच्या भक्षस्थानी पडण्यास फारसा वेळ लागत नाही . मात्र बिबट्याचे सहज शिकारीचे हे डावपेच प्रत्येक वेळी साध्य होतातच असे नाही. देवरुख येथे राहणारे ठेकेदार सुरेंद्र देसाई यांच्या गोल्डी नावाच्या धष्टपुष्ट असणाऱ्या लॅब्रेडॉर कुत्र्याने चक्क बिबट्याला आल्या वाटेने पळवून लावले आणि आपणच खरा शेर असल्याचे दाखवून दिले. गोल्डी देसाई यांच्या बंगल्याच्या पोर्च मध्ये बसून पहारा देत होता. सुरेंद्र यांच्या घराशेजारीच राहात असलेले त्यांचे कनिष्ठ बंधू निनाद गोव्याहून रात्री २ च्या दरम्याने देवरुखमध्ये परतले. निनाद आल्याची चाहूल लागताच गोल्डी त्यांच्या जवळ जावून आपले लाड करुन घेऊन परत जागेवर येवून बसला होता. निनाद थोड्या वेळाने आपल्याघरी झोपी गेले. याच दरम्यान अचानक गोल्डीवर बिबट्याने हल्ला केला. बिबट्याने त्याचा गळा पकडला. मात्र आकांताने गोल्डी ओरडला.
निनाद यांनी तत्काळ लाईट लावून बाहेर पाहिले तर, समोरील दृष्य पाहून त्यांचा विश्वासच बसेना. बिबट्या आणि गोल्डी यांची थरारक झुंज सुरु होती. गोल्डीने केलेला हल्ल्यापुढे अखेरीस शरणागती पत्करत बिबट्याने धूम ठोकली. रात्री २.४५ च्या सुमारास घडलेल्या या झुंजीचा थरार निनाद यांच्यासह स्वतः सुरेंद्र देसाई यांनी देखील अनुभवला. या झुंजी मध्ये गोल्डी गंभीर जखमी झाला. त्याच्या गळ्याला बिबट्याची नखे आणि दात लागून मोठी जखम झाली. एवढ्या जखमा सहन करीत गोल्डीने बिबट्याला पळवून लावले हे पाहून सुरेंद्र देसाई यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. देवरुख येथील अनुभवी पशुवैद्यक हुसैन शेख यांनी तातडीने उपचार केले आणि त्याच्या प्रकृतीला कोणताही धोका नसल्याचा निर्वाळा दिला. दरम्यान गोल्डीच्या या अफाट धाडसामुळे शेरास सव्वाशेर ! या म्हणीचे प्रत्यंतर देसाई कुटूबीयांना आले.




























































