मुंबईत कुत्र्याच्या हल्ल्यात एका डॉग ट्रेनरचा मृत्यू झाला आहे. हा ट्रेनर ज्या कुत्र्याला प्रशिक्षण देत होता त्याच कुत्र्याने ट्रेनरवर हल्ला केला. पण ट्रेनरच्या कुटुंबीयांनी यात काहीतरी काळंबेरं असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार विक्रोळीत राहणारा 22 वर्षीय हसरत अली हा मार्शल डॉग या कंपनीत प्रशिक्षक म्हणून काम करत होता. अलीचे काका परवेझ शेख यांनीच हसरत अलीला इथे कामाला लावलं होतं. या कंपनीत ग्रेट डेन सारख्या जातीच्या कुत्र्यांना प्रशिक्षित केले जात होते.
विक्रोळीच्या गोद्रेज परिसरात हसरत या कुत्र्यांना प्रशिक्षण देत होता. तेव्हा एका कुत्र्याने हसरतवर हल्ला केला आणि त्यात हसरत गंभी जखमी झाला. त्याला तातडीने घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केले. पण दाखल केल्यानंतर दोन तासांनंतर हसरतला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
हसरतचे काका परवेझ शेख यांनी यात काही काळेबेरे असल्याचा संशय व्यक्त केला आहे. गेल्या आठ महिन्यांपासून हसरत या कुत्र्यांना प्रशिक्षण देत होता, ते कुत्रे हसरतच्या ओळखीचे झाले होते म्हणून कुत्र्यांनी हल्ला केला असे वाटत नाही असे परवेझ शेख म्हणाले. सोमवारी हसरतचे रुग्णालयात निधन झाले पण त्याच्यावर शवविच्छेदन करायला वेळ लागला म्हणून त्याच्या कुटुंबीयांनही आक्षेप नोंदवला होता.