
ठाणे शहरात भटक्या कुत्र्यांची चांगलीच दहशत वाढली असून जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यात तब्बल १२ हजार ४६५ नागरिकांचे लचके तोडले आहेत. पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीतून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. याशिवाय खासगी दवाखान्यात उपचार घेतलेल्या रुग्णांची संख्यादेखील बहुतांश आहे. सुदैवाने यात कोणाचाही मृत्यू झालेला नाही. त्यामुळे पालिकेच्या निर्बिजीकरण मोहिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ठाणे पालिका हद्दीतील भटक्या श्वानांना पकडून त्यांची नसबंदी आणि अॅण्टी रेबीज लसीकरण करण्यात अक्षम्य हेळसांड सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. वास्तविक भटक्या श्वानांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी नसबंदी आणि रेबीज मोहीम सातत्याने राबविणे गरजेचे असते, परंतु पालिका प्रशासनाने यासंदर्भातील काढलेल्या निविदा प्रक्रियेला दोन वेळा मुदतवाढ देऊनही शून्य प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. दरम्यान, भटक्या श्वानांचा उपद्रव आणि चावे घेतल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून एखाद्याच्या जीवावर बेतल्यावर पालिकेला जाग येणार आहे का? असा सवाल ठाणेकर नागरिक करीत आहेत.
श्वानांची संख्या ८० हजारांवर
ठाणे शहरात श्वानांची संख्या ८० हजारांच्या आसपास पोहोचली असून यात सुमारे पाच हजार पाळीव श्वान आहेत, तर उर्वरित तब्बल ७५ हजारांहून अधिक भटके कुत्रे आहेत. ठाण्याच्या लोकसंख्येच्या दोन टक्के श्वान शहरात असल्याचा दावा ठाणे महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडून केला जात असतो. ठाणे शहरात तब्बल ७५ हजार भटके
श्वान असून तलावांचे शहर आता भटक्या
कुत्र्यांचे शहर बनत चालले आहे. महिनाभरात निविदा प्रक्रिया दिवसेंदिवस श्वानदंशाच्या घटना वाढत असल्याने पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने भटके व मोकाट श्वानांना पकडण्याकरिता निविदा मागविण्यात आली आहे. या निविदेस दोन वेळा मुदतवाढही देण्यात आली आहे. दरम्यान, येत्या महिनाभरात निविदा प्रक्रिया पूर्ण होईल, त्यानंतर भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला जाईल.




























































