गणेशोत्सवासाठी लागणारी परवानगी पोलीस ठाणेपातळीवरच मिळेल. यंदा डॉल्बी लावण्याचे धाडस कुणीही करू नये, कारण पोलीस प्रशासनाकडून डॉल्बी जप्त कण्यात येणार आहे. त्याचबरोबर डॉल्बीमालक, ट्रक्टरमालक व मंडळांवरही कारवाई केली जाणार आहे. डॉल्बीमुक्त मिरवणूक काढून पारंपरिक काद्यांत गणेशोत्सव उत्साहात साजरा करावा, असे आवाहन भुईंजचे सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांनी केले.
भुईंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेश मंडळांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी अनेक गावांतील मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सहायक पोलीस निरीक्षक गर्जे म्हणाले, गणेशोत्सवकाळात सोशल मीडियावर सायबर क्राइमची करडी नजर आहे. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करत असताना, सामाजिक हित जोपासावे. जातीय सलोखा राखला जावा, याची दक्षता मंडळांनी घ्यावी. शासनाच्या नियमांचे पालन करावे.
गणेशोत्सव आगमन व विसर्जनावेळी कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवावी. उत्सवात महिलांचा सहभाग वाढवावा. सामाजिक आणि प्रबोधनात्मक उपक्रम हाती घ्यावेत. प्रतिष्ठापना व विसर्जन मिरकणुकीमध्ये वेळेचे बंधन पाळावे. सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, गरजू, होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करावी, वैद्यकीय मदत केंद्र सुरू करावे, असेही गर्जे यांनी सांगितले.
यावेळी पीएसआय विशाल भांडारे, सहायक फौजदार वैभव टकले व सचिन नलावडे, हवालदार अप्पासाहेब कोलवडकर, सुनील दगडे, नितीन जाधव उपस्थित होते.