
शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नववर्ष स्वागताचे डोंबिवलीत लावलेले बॅनर्स समाजकंटकांनी फाडल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. साम-दाम-दंड-भेदाचा वापर करूनही शिवसैनिक भीक घालत नसल्याने पोटदुखी उठलेल्यांनी भ्याडपणे शनिवारी मध्यरात्री डोंबिवली पूर्व शहर मध्यवर्ती शाखेबाहेर लावलेले सर्व बॅनर्स फाडले. मात्र हे कृत्य करताना बॅनरवर असलेले प्रभू श्रीराम, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या छायाचित्रांचादेखील विचार केला नाही. या घोर अवमानाविरोधात संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी जोरदार घोषणा दिल्या. याबाबत रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मानपाडा रोडवर शिवसेनेची शहर शाखा असून या ठिकाणी गुढीपाडव्यानिमित्त नववर्षाचे स्वागत करणारे बॅनर्स लावण्यात आले होते. यावर प्रभू श्रीरामासह शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचे छायाचित्र होते. या भागात शिवसेनेची मोठी ताकद असल्याने मळमळ उठलेल्या काही जणांच्या टोळक्याने मध्यरात्री भ्याडपणे हे तिन्ही बॅनर्स फाडून पळ काढला. या घटनेची माहिती सकाळी वाऱ्यासारखी परिसरात पसरताच तणाव निर्माण झाला. डोंबिवली शहरप्रमुख विवेक खामकर यांनी याबाबत रामनगर पोलिसांना कळवले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यावेळी महिला जिल्हा संघटक कविता गावंड, शहर संघटक किरण मोंडकर, शहर कार्यालयप्रमुख सतीश मोडक, उपशहरप्रमुख कुणाल ढापरे, विभागप्रमुख श्याम चौगुले, शाखाप्रमुख प्रसाद चव्हाण, विभागप्रमुख शिवराम हळदणकर, महिला विभाग संघटक शिल्पा मोरे यांच्यासह शिवसैनिकांनी बॅनर फाडणाऱ्यांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
पोलीस ठाण्यावर धडक
शिवसैनिकांनी बॅनर फाडणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी रामनगर पोलीस ठाण्यावर धडक देत कडक कारवाईची मागणी केली. दरम्यान, या घटनेनंतर शहरप्रमुख विवेक खामकर यांनी विरोधकांवर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, बॅनर फाडताना प्रभू श्रीरामचंद्र, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांच्या छायाचित्रांचा तरी विचार करायला हवा होता. इतका पोटशूळ बरा नसून याचे उत्तर शिवसैनिक निवडणुकांमधील विजयातून नक्कीच देईल असा इशारा दिला.

























































