
गणेशोत्सवाच्या एक दिवस आधी डोंबिवलीतून पसार झालेला मूर्तिकार अखेर गजाआड झाला आहे. महात्मा फुले रोडवर आलेल्या चिनार मैदानात आनंदी कला केंद्राचा मूर्तिकार प्रफुल्ल तांबडे याने गणेशमूर्तीच्या मोठ्या ऑर्डर घेतल्या होत्या. मात्र हे काम त्याला पूर्ण करता आले नाही. त्यामुळे त्याने सोमवारी रात्री डोंबिवलीतून पलायन केले होते. त्यामुळे गणेश भक्तांची मोठी पंचायत झाली होती.
डोंबिवली पश्चिमेतील चिनार मैदानाजवळील दोन मंडपांमध्ये मूर्ती बुकिंगसाठी व्यवस्था करण्यात आली होती. आनंदी कला केंद्रातून शेकडो गणेशभक्तांनी मूर्तीची नोंदणी केली होती. मात्र प्रफुल्ल तांबडे याने क्षमतेपेक्षा जास्त ऑर्डर्स स्वीकारल्या आणि कामाचा भार न पेलवता आल्याने सोमवारी रात्रीपासून अचानक गायब झाला. याशिवाय काही सार्वजनिक गणेश मंडळांच्या सदस्यांनी वेळेवर मूर्ती न दिल्याने तांबडे याला दम भरला होता. त्यामुळे भीतीपोटी तो आपले गाव सातारा येथे पळून गेला, असे समोर आले आहे. तांबडे याला ताब्यात घेण्यात आले आहे, असे विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम चोपडे यांनी सांगितले. दरम्यान, तांबडे अचानक गायब झाल्याने त्याच्याकडे मूर्ती बुक केलेल्या गणेश भक्तांचा गोंधळ उडाला होता.
मार खाण्याच्या भीतीने गाव गाठले
तांबडे फरार झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. आमचा मुलगा मार खाण्याच्या भीतीपोटी गावी जाऊन तेथील घरात लपून बसला आहे. त्याचेही लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे असे सांगत त्याला पोलिसांसमोर आणले. आज सकाळी प्रफुल्ल तांबडे याला विष्णुनगर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला नोटीस बजावून न्यायालयात त्याच्यावर दोषारोपपत्र दाखल करणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.