
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या भीषण युद्धाची झळ सर्वसामान्य नागरिकांना बसायला सुरुवात झाली आहे. इराण-इस्रायल-अमेरिका युद्धामुळे जागतिक स्तरावर ऊर्जा संकट गडद होत असताना हिंदुस्थानात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरामध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. घरगुती वापराचा 14.2 किलो वजनाचा गॅस सिलिंडर 60 रुपयांनी, तर व्यावसायिक वापराचा 19 किलो वजनाचा गॅस सिलिंडर 115 रुपयांनी महाग झाला आहे. शनिवार 7 मार्च 2026 पासून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. घरगुती गॅस सिलिंडरची किंमत वाढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडणार आहे.
देशातील प्रमुख शहरातील घरगुती गॅस सिलिंडरचे दर
- मुंबई – 852.50 रुपयांवरून आता 912.50 रुपये
- दिल्ली – 853 रुपयांवरून आता 913 रुपये
- कोलकाता – 879 रुपयांवरून आता 939 रुपये
- चेन्नई – 868.50 रुपयांवरून आता 928.50 रुपये
Domestic LPG price hiked by Rs 60, commercial cylinder up Rs 115 from March 7
Read @ANI Story |https://t.co/0ustuSRwig#LPGPriceHike #DomesticCylinder #CommercialCylinder pic.twitter.com/AN29YqIkVd
— ANI Digital (@ani_digital) March 6, 2026
दरम्यान, हॉटेल, रेस्टॉरंट आणि छोट्या व्यावसायांसाठी वापरल्या जाणाऱ्या 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 115 रुपयांची वाढ झाली आहे. मुंबईत व्यावसायिक वापराचा गॅस सिलिंडर 1835 रुपयांवर, तर दिल्लीत 1883 रुपयांवर पोहोचला आहे. या दरवाढीमुळे हॉटेलमधील जेवण आणि बाहेरील खाद्यपदार्थ महाग होण्याची चिन्ह आहेत. याचा फटकाही सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे.
इंधनाचा तुटवडा? सरकार म्हणते…
एकीकडे दरवाढ झाली असली तरी देशात इंधनाचा तुटवडा नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी एक्सवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली. देशात ऊर्जेचा कोणताही तुटवडा नाही. नागरिकांना परवडणारे आणि शाश्वत इंधन उपलब्ध करून देणे ही आमची प्राथमिकता आहे, असेही पुरी यांनी स्पष्ट केले. तसेच इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने देखील इंधन टंचाईच्या अफवा फेटाळून लावल्या आहेत. देशात पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा पुरेसा साठा असून पुरवठा साखळी सुरळीत सुरू असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.




























































