
युरोपीय युनियन व मेक्सिकोला येत्या 1 ऑगस्टपासून 30 टक्के टॅरिफ लागू होणार असल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ट्रम्प यांनी ही माहिती दिली.
टेरिफ लेटर जारी करताना ट्रम्प यांनी अमेरिकेतील ड्रग्ज तस्करीला मेक्सिको जबाबदार असल्याचा आरोप केला. तसेच युरोपीय युनियनमुळे व्यापारात अस्थिरता आल्याचा दावाही त्यांनी केला. याआधी ट्रम्प यांनी लिबिया, अल्जेरिया, इराक, मोल्दोवा, फिलिपाइन्स व बुनोई या देशांनाही टेरिफ लागू केला आहे. या टेरिफ बॉम्बमुळे जगभरातील गुंतवणूकदारांना मोठा आर्थिक फटका बसण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
हिंदुस्थानला अपेक्षा
ट्रम्प यांनी जवळपास 20 देशांना टेरिफ लागू करणार असल्याचे जाहीर केले आहे. म्यानमार, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया व जपानसारख्या देशांचा यात समावेश आहे. ट्रम्प यांनी आपल्या सहकारी देशांनाही टेरिफ जारी केला आहे. मात्र हिंदुस्थानबाबत सस्पेंस अजूनही कायम आहे. दोन्ही देशांमध्ये व्यापार सामंजस्य करार होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
ब्राझीलला सर्वाधिक टेरिफ
ट्रम्प यांनी सर्वाधिक 50 टक्के टेरिफ ब्राझीलवर लादला आहे. म्यानमार व लाओसवर प्रत्येकी 40 टक्के तर पंबोडिया व थायलंडवर 36 टक्के टेरिफ लागू करण्यात आला आहे. बांगलादेश व सर्बियावर 35 टक्के तर इंडोनेशियावर 32 टक्के तसेच दक्षिण आफ्रिका, बोस्निया व हर्जेगोविनावर 30 टक्के टेरिफ आकारण्यात आला आहे. जपान, कजाखस्तान, मलेशिया, दक्षिण कोरिया व टय़ुनेशियावर 25 टक्के टेरिफ लागू करण्यात आला आहे.