
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानातून आयात होणाऱ्या वस्तूंवर 25 टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा बुधवारी केली. एवढेच नाही तर रशियाकडून तेल आणि शस्त्रास्त्र खरेदी केल्याबद्दल दंडही ठोठावला. ही घोषणा होऊन काही तास होत नाही तोच मोदींचे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानला आणखी एक मोठा धक्का दिला. हिंदुस्थानचा कट्टर शत्रू पाकिस्तानसोबत अमेरिकेने मोठी डील केली आहे.
हिंदुस्थानवर टॅरिफ लादण्याची घोषणा केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानसोबत मोठा व्यापार करार केला. पाकिस्तानमध्ये तेलाचे साठे विकसित करण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली. कदाचित एक दिवस पाकिस्तान हिंदुस्थानलाही तेल विकेल, असेही ट्रम्प म्हणाले. यासंदर्भात त्यांनी ‘ट्रुथ’ या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे.
‘व्हाईट हाऊस गेल्या काही दिवसांपासून व्यापार करारांवर काम करण्यात व्यस्त आहे. मी या संदर्भात अनेक देशांच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा केली, ते अमेरिकेशी व्यापार करार करण्यास उत्सुक आहेत. मी नुकतीच दक्षिण कोरियाच्या व्यापार प्रतिनिधी मंडळाची भेट घेतली. दक्षिण कोरियावर 25 टक्के टॅरिफ लावण्यात आलेला आहे, मात्र त्यांच्याकडे हा कर कमी करण्याचा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव काय आहे जाणून घ्यायलाही मी उत्सुक आहे’, असे ट्रम्प म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, आम्ही आताच पाकिस्तानसोबत एक करार केला आहे. त्याअंतर्गत दोन्ही देश पाकिस्तानच्या तेल साठ्यांच्या विकासासाठी एकत्र काम करतील. कदाचित एक दिवस पाकिस्तान हिंदुस्थानलाही तेल विकेल, असे म्हणत ट्रम्प यांनी या संदर्भात एका कंपनीशी बोलणी सुरू असल्याचेही म्हटले.
सध्या अनेक देश कर कमी करण्याचा प्रस्ताव देत आहेत. यामुळे व्यापारी तूट कमी करण्यास मदत होईल. याबाबत योग्य वेळी अहवाल सादर केला जाईल, असेही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.