अमेरिकेत परेड Vs निदर्शने! लष्करी परेड आणि स्वतःच्या वाढदिवसावर ट्रम्प यांनी उडवले 350 कोटी; निषेध व्यक्त करत जनतेची निदर्शने

अमेरिकेत एकाच वेळी उत्सव आणि निषेधाचे वातावरण दिसत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा वाढदिवस आणि अमेरिकन सैन्याच्या 250 व्या वर्धापन दिनानिमित्त उत्सवाचे वातावरण आहे. तर ट्रम्प यांचा वाढदिवस आणि या निमित्ताने अमेरिकन सैन्याची भव्य परेड यासाठी तब्बल 350 कोटींचा चुराडा करण्यात आला. त्यामुळे ट्रम्प यांच्या धोरणांनी आधीच संतप्त असलेल्या जनतेच्या संतापात भर पडली आणि त्याचा निषेध करण्यासाठी जनता मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी 14 जून रोजी त्यांचा 79 वा वाढदिवस साजरा केला. तसेच याच दिवशी अमेरिकन सैन्याचा 250 वा वर्धापन दिनही आहे. या प्रसंगी राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये एक भव्य सैन्य परेड आयोजित करण्यात आली होती. त्यात 6000 हून अधिक सैनिक, 150 हून अधिक चिलखती वाहने आणि 50 हून अधिक लढाऊ विमानांचा सहभाग होता. या भव्य परेडवर 350 कोटी रुपयांहून अधिक खर्च करण्यात आला आहे. त्याचा जनतेतून निषेध व्यक्त होत आहे.

ट्रम्प यांच्या विरोधकांचा आरोप आहे की अमेरिकन सैन्याची ही भव्य परेड प्रत्यक्षात ट्रम्प यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे. याला सार्वजनिक पैशाचा पूर्णपणे अपव्यय आणि हुकूमशाहीचे प्रतीक म्हणून वर्णन केले जात आहे. देशभरात या परेडविरुद्ध व्यापक निदर्शने होत आहेत, ज्यामध्ये मार्क रफालो सारख्या हॉलिवूड स्टार्सनीही भाग घेतला होता.

लष्करी परेडमध्ये टँक, चिलखती वाहने आणि लढाऊ विमानांचा समावेश होता, ज्याचे वर्णन एक प्रकारचे शक्तीप्रदर्शन म्हणून केले गेले. तथापि, अमेरिकन सरकारचे म्हणणे आहे की ही परेड अमेरिकन सैन्याच्या स्थापनेच्या 250 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आली होती. या लष्करी परेड दरम्यान कडक सुरक्षा व्यवस्था होती. अमेरिकन गुप्तहेर सेवेने 18 मैलांपर्यंत अँटी-स्केल कुंपण बसवले होते. पण योगायोगाने, ट्रम्प यांच्या वाढदिवसानिमित्त लष्करी परेड आयोजित करणे आणि त्यावर भरपूर पैसे खर्च करणे याला विरोध केला जात आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या परेडचे वर्णन देशाच्या लष्करी शक्तीचे प्रदर्शन म्हणून केले आणि त्यांनी निदर्शकांना इशारा दिला की कोणताही हिंसाचार सहन केला जाणार नाही. सुरक्षा दलांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.

ट्रम्प यांच्या धोरणांना आणि लष्करी परेडला हुकूमशाहीचे प्रतीक मानून नो किंग्ज अशा घओषणा देत निदर्शकांना निषेध व्यक्त केला आहे. अमेरिकेत अनेक ठिकाणी हे निदर्शने होत आहेत. नो किंग्ज असे फलक घेत जनता रस्त्यावर उतरली आहे. अमेरिकेत 1,500 हून अधिक ठिकाणी निदर्शने होत आहेत. हॉलिवूडमधील अनेक तारे या निदर्शनांमध्ये सहभागी झाले होते. हे चित्रपट तारे मूळतः ट्रम्प यांच्या धोरणांना, विशेषतः बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्धच्या त्यांच्या कठोर कारवाईला विरोध करण्यासाठी आग्रेसर आहेत. ट्रम्प समर्थक या परेडला देशाच्या लष्करी ताकदीचे प्रतीक मानतात, तर विरोधक याला हुकूमशाही म्हणत आहेत. त्यामुळे अमेरिकेत आता संघर्ष शिगेला पोहचला आहे.