टॅरिफ बॉम्ब फुटला! मोदींचे मित्र ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर लादला 25 टक्के आयात कर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 1 ऑगस्टच्या अंतिम मुदतीपूर्वीच हिंदुस्थानवर 25 टक्के कर लादला आहे. कर लादताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानला धमकीची भाषा वापरली. डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाशी असलेल्या मैत्रीमुळे हिंदुस्थानवर हा कर लादला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हिंदुस्थान रशियाकडून सर्वाधिक कच्चे तेल आयात करत आहे. त्यामुळे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी दंडासह हिंदुस्थानवर 25 टक्के कर लादला आहे, असं वृत्त टीव्ही9 हिंदीने दिले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानसह मेक्सिको आणि कॅनडावरही 25 टक्के आयात शुल्क लागू केले आहे. यामुळे हिंदुस्थानातून निर्यात होणाऱ्या वस्तूंवर, विशेषत: माहिती तंत्रज्ञान (IT), कापड, आणि फार्मास्युटिकल्स यांसारख्या क्षेत्रांवर मोठा परिणाम होऊ शकतो. ट्रम्प यांनी यापूर्वी हिंदुस्थानला टॅरिफ किंग म्हणत टीका केली होती आणि हिंदुस्थाने अमेरिकन उत्पादनांवर लावलेले उच्च शुल्क कमी करण्याची मागणी केली होती. आता त्यांनी स्वत: हिंदुस्थानवर टॅरिफ लादून व्यापार तणाव वाढवला आहे.

दरम्यान, हिंदुस्थान आणि अमेरिका यांच्यातील व्यापार हा दोन्ही देशांसाठी महत्त्वाचा आहे. 2024 मध्ये दोन्ही देशांमधील व्यापार 120 अब्ज डॉलरपेक्षा अधिक होता. हिंदुस्थानमधून अमेरिकेत सॉफ्टवेअर सेवा, औषधे, आणि कापड यांची मोठ्या प्रमाणात निर्यात होते, तर अमेरिकेतून हिंदुस्थानात तेल, गॅस, आणि संरक्षण उपकरणे आयात केली जातात.