
पॅलेस्टाईनला स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र म्हणून मान्यता देण्याच्या निर्णयाकडे पावलं टाकणे कॅनडाला महागात पडले आहे. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी हा निर्णय घेताच अमेरिकेत वेगाने चक्र फिरली आणि ट्रम्प प्रशासनाने टॅरिफ बॉम्ब फोडला. अमेरिका-मेक्सिको-कॅनडा व्यापार करारामध्ये समाविष्ट नसलेल्या कॅनडाच्या सर्व वस्तूंवरील टॅरिफ 25 टक्क्यांवरून 35 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. 1 ऑगस्टपासून हा टॅरिफ लागू होणार असून या निर्णयावर डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केल्याचे व्हाईट हाऊसने स्पष्ट केले आहे.
डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा सत्तेवर आल्यापासून त्यांनी अमेरिका फर्स्ट धोरण राबवण्यास सुरुवात केली. एकामागोमाग एक निर्णय घेत त्यांनी खळबळ उडवून दिली. ट्रम्प यांनी टॅरिफ बॉम्ब फोडल्यावर जगभरातील शेअर बाजारावरही परिणाम झाला होता. या दरम्यान व्यापार करारासाठी ट्रम्प यांनी दुसऱ्या देशांना शुक्रवारपर्यंतची मुदत दिली होती.
1 ऑगस्टपूर्वी जो देश अमेरिकेशी करार करणार नाही त्यांच्या वस्तूंवर जास्त टॅरिफ लावण्याचा इशाराही ट्रम्प यांनी दिला होता. या मुदतीमध्ये कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी ट्रम्प यांच्याशी संपर्कही साधला होता. मात्र दोघांमध्ये व्यापाराबाबत कोणतीही चर्चा झाली नाही.
पॅलेस्टाइनला मान्यता देण्याची कॅनडाची घोषणा, अमेरिका-इस्रायल जोडीला झटका
याच दरम्यान कॅनडाने पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देण्याचा निर्णय घेतला. अर्थातच हा निर्णय इस्त्रायलचा मित्र अमेरिकेच्या पचनी पडला नाही. त्यानंतर लागलीच ट्रम्प प्रशासानाने कॅनडावर टीका करत टॅरिफमध्ये 10 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावर कॅनडातील कार्नी प्रशासनाने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.
हिंदुस्थानी अर्थव्यवस्था ‘मेलीय’, ट्रम्प यांचा मोदींना धक्का, अमेरिकेचा पाकिस्तानशी मोठा तेल करार
कॅनडाने पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देण्याच्या दिशेने पाऊल टाकण्याचा निर्णय घेतल्यानंतर ट्रम्प यांनी यावर प्रतिक्रिया दिली होती. या निर्णयानंतर कॅनडाशी करार करणे खूप कठीण असेल, असे ते म्हणाले होते. तसेच कॅनडा अमेरिकेच्या शेती उत्पादनांवर खूप कर लादत आहे. काही वस्तूंवर तर 200 टक्के पेक्षा जास्त कर लादून कॅनडा अमेरिकेच्या शेतकऱ्यांना क्रूर वागणूक देत आहे, असे ट्रम्प म्हणाले होते. कॅनडा हा माझा आवडता देश आहे, मात्र गेल्या काही वर्षात त्यांची वागणूक आमच्याशी वाईट असल्याचेही ते म्हणाले होते.