… तर युक्रेनला लांब पल्ल्याचे टोमाहॉक क्षेपणास्त्र देणार; डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची अलास्का ऑगस्ट महिन्यात अलास्का येथे भेट झाली होती. या भेटीत रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या अडीच-तीन वर्षापासून सुरू असलेल्या युद्धावर तोडगा निघेल अशी शक्यता होती. मात्र तसे काहीही होताना दिसत नसल्याने डोनाल्ड ट्रम्प यांनी आता थेट रशियाला धमकी दिली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युद्ध थांबवले नाही, तर युक्रेनला लांब पल्ल्याचे टोमाहॉक क्षेपणास्त्र देऊ शकतो, असे विधान डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलला रवाना होण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना केले.

डोनाल्ड ट्रम्प पुढे म्हणाले की, ‘युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्याची झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी टोमाहॉक क्षेपणास्त्रांसह इतर शस्त्रांची मागणी केली होती. युक्रेनला टोमाहॉक क्षेपणास्त्र हवे असून हे एक मोठे पाऊल आहेत. त्यामुळे पुतीन यांनी युद्ध थांबवले नाही, तर आम्ही युक्रेनला टोमाहॉक क्षेपणास्त्र देऊ शकतो.’ याचवेळी त्यांनी टॅरिफची भीती दाखवून हिंदुस्थान-पाकिस्तान युद्ध थांबवल्याचा पुनरुल्लेखही केला.

‘टॅरिफच्या बळावर मी अनेक युद्ध थांबवली. उदाहरणार्थ, हिंदुस्थान आणि पाकिस्तान. मी त्यांना सांगितले की, तुमच्याकडे अण्वस्त्र असून तुम्ही युद्ध सुरू ठेवले तर मी तुमच्यावर खूप जास्त टॅरिफ लावेल. जसे की 100 टक्के, 150 टक्के, 200 टक्के. मी टॅरिफ लावतोय असे म्हटले आणि पुढील 24 तासात सर्व पूर्ववत झाले. मी टॅरिफ लादले नसले तर हे युद्ध कधी संपले नसते’, असे ट्रम्प म्हणाले.

युक्रेनला टोमाहॉक क्षेपणास्त्र मिळाले तर…

युक्रेनला लांब पल्ल्याचे टोमाहॉक क्षेपणास्त्र मिळाले तर रशियाच्या आत घुसून त्यांना हल्ला करता येईल. रशियाच्या महत्त्वाचे सैन्य अड्डे युक्रेनच्या निशाण्यावर येतील. टोमाहॉक क्षेपणास्त्र 2500 किलोमीटर पर्यंत हल्ला करण्यास सक्षम आहे. याचाच अर्थ युक्रेन थेट मॉस्कोवर हल्ला करू शकतो.