दोनशे टक्के टॅरिफची धमकी देऊन ‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवले! ट्रम्प यांचा दिवाळी धमाका

चीनला 100 टक्के अतिरिक्त टॅरिफची धमकी दिल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज हिंदुस्थानला धक्का दिला. ‘‘200 टक्के टॅरिफची धमकी देऊन मी ‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवले,’’ असा दिवाळी धमाकाच त्यांनी केला. टॅरिफ हाच हिंदुस्थान-पाकिस्तान युद्धातील शांतिदूत ठरल्याचे ते म्हणाले.

इस्रायल दौऱ्यावर रवाना होण्याआधी पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी पुन्हा टॅरिफची महती सांगितली. ‘‘जगातील आठ युद्धे मी थांबवली. यातली बहुतेक युद्धे मी टॅरिफचा वापर करून थांबवली. हिंदुस्थान-पाकिस्तानचे थांबलेले युद्ध हे त्याचेच उदाहरण आहे. तुम्हाला लढायचे असेल तर दोन्ही देशांवर जबर टॅरिफ लावणार. हे टॅरिफ 100 टक्के, 150 टक्के आणि 200 टक्केही असू शकते. या धमकीने जादू केली आणि अवघ्या 24 तासांत दोन्ही देशांनी माघार घेतली. टॅरिफ नसते तर हे कधीच शक्य झाले नसते,’’ असे ट्रम्प म्हणाले.

‘‘टॅरिफमुळे आम्हाला केवळ चीनकडूनच नव्हे तर इतर देशांकडूनही शेकडो अब्ज डॉलर्स मिळत आहेत. आम्ही पुन्हा श्रीमंत देश झालो आहोत. टॅरिफमुळे आम्हाला राजनैतिक बळ मिळाले आहे. वाटाघाटीच्या टेबलावर आम्ही मजबूत झालो आहोत,’’ असे ट्रम्प म्हणाले.

गाझा शांतता करारावर सही-शिक्के

दोन वर्षांपासून इस्रायल व हमासमध्ये सुरू असलेले युद्ध थांबवण्याच्या निर्णयावर आज औपचारिक शिक्कामोर्तब झाले. अमेरिका, इजिप्त, कतार आणि तुकाa या देशांनी गाझा शांतता करारावर स्वाक्षरी केली. कराराच्या मसुद्यात युद्धबंदीच्या संबंधीचे सर्व नियम, कायदे आणि इतर गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत. त्यांचे पूर्ण पालन होईल, असा विश्वास ट्रम्प यांनी यावेळी व्यक्त केला.