इराणने मला ‘सर्वोच्च नेता’ बनवण्याची ऑफर दिली होती, पण…, डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आखातामध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. इराणने मला सर्वोच्च नेता बनण्याची ऑफर दिली होती. मात्र हा प्रस्ताव मी नाकारला, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. सोशल मीडियावर या संबंधीचा एक व्हिडीओही व्हायरल होत आहे.

इराणच्या नेतृत्वाने मला देशाचे सर्वोच्च पद स्वीकारण्याचा अनौपचारिक प्रस्ताव दिला होता, परंतु मी तो स्पष्टपणे नाकारला, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. रिपब्लिकन पक्षाच्या एका स्नेहभोजन कार्यक्रमात ते बोलत होते.

इराण आता पूर्णपणे बॅकफूटवर असून त्यांना युद्धाचा शेवट हवा आहे. इराणमधील सध्याची स्थिती पाहता तिथे नेतृत्व करण्यासाठी कोणताही स्थानिक नेता सक्षम उरलेला नाही. याच गोंधळातून मला अनौपचारिकपणे सर्वोच्च नेतेपदाची ऑफर देण्यात आली होती, मात्र मी त्याला नकार दिला. इराणमध्ये सध्या कमालीची भीती असून ते सामंजस्याने चर्चेसाठी प्रयत्न करत आहेत, असेही डोनाल्ड ट्रम्प यावेळी म्हणाले.

इराणचे प्रत्युत्तर

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर इराणे प्रतिक्रिया दिली आहे. इराणी सैन्याचे प्रवक्ते इब्राहिम जुल्फकारी यांनी हा दावा फेटाळून लावत अमेरिका स्वत:च्या कल्पनाविश्वात जगत आहे का? असा कडक सवाल केला आहे.

खामेनींचा मृत्यू, वारस बेपत्ता?

इस्रायल आणि अमेरिकेने 28 फेब्रुवारी रोजी केलेल्या संयुक्त कारवाईत इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर इराणचे अनेक वरिष्ठ लष्करी अधिकारीही मारले गेले. खामेनी यांच्यानंतर त्यांचा मुलगा मोजतबा खामेनी यांच्याकडे इराणची सूत्रे सोपवण्यात आली होती, मात्र तेही सध्या बेपत्ता आहेत. मोजतबा खामेनी इस्रायली हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याची चर्चा आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये आहे. या पार्श्वभूमीवर, इराणमध्ये सत्तेची मोठी पोकळी निर्माण झाली असून ट्रम्प यांच्या या नव्या दाव्यामुळे जागतिक राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

वेळ निघून जाण्यापूर्वी गंभीर व्हा, अन्यथा परतीचे मार्ग बंद! युद्धबंदीचा प्रस्ताव फेटाळल्याने ट्रम्प भडकले, इराणला कडक शब्दात तंबी