
हिंदुस्थानवर लावलेल्या टॅरिफमध्ये मोठी वाढ करण्याची धमकी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. युव्रेनमध्ये मरणाऱया लोकांची हिंदुस्थानला अजिबात पर्वा नाही, असा आरोपही ट्रम्प यांनी केला. हिंदुस्थान-पाकिस्तानचे युद्ध थांबवल्याचा दावा करणाऱया ट्रम्प यांना रशिया व युव्रेनमधील युद्धही थांबवायचे आहे. त्यासाठी त्यांनी रशियाला अल्टिमेटम दिला आहे, मात्र रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी हा अल्टिमेटम झुगारून युव्रेनवर हल्ले सुरूच ठेवले आहेत. त्यामुळे ट्रम्प यांनी आर्थिक नाकाबंदीचा मार्ग पत्करला आहे. रशियाकडून तेल खरेदी करणाऱया देशांना ट्रम्प धमकावत आहेत. हिंदुस्थानवर तर त्यांनी 25 टक्के टॅरिफसह दंडही लावला आहे. तरीही हिंदुस्थानकडून रशियाशी व्यापार सुरू असल्याने ट्रम्प यांचा तीळपापड झाला आहे.
मोदी एवढे घाबरतात का?
ट्रम्प यांच्या नव्या धमकीनंतर काँग्रेसने लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. ’ट्रम्प रोजच्या रोज हिंदुस्थानच्या विरोधात काही ना काही बडबडत आहेत आणि नरेंद्र मोदी गुपचूप ऐकून घेत आहेत. मोदी हे डोनाल्ड ट्रम्पना इतके का घाबरतात, असा सवाल काँग्रेसने केला.
हिंदुस्थान विक्रीही करतोय!
‘टथ सोशल’ या अकाऊंटवर पोस्ट लिहून त्यांनी आज हिंदुस्थानवर आगपाखड केली. ‘हिंदुस्थान रशियाकडून तेल केवळ खरेदी करत नाही, तर खरेदी केलेले तेल खुल्या बाजारात विकून बक्कळ नफा कमावतो आहे. रशियाच्या हल्ल्यांमुळे युव्रेनमध्ये मरणाऱ्या लोकांची हिंदुस्थानला काडीची पर्वा नाही. त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागणार आहेत. हिंदुस्थानवरील टॅरिफमध्ये मी आणखी वाढ करणार आहे, असे ट्रम्प आज म्हणाले.
रशियाकडून तेल घेणे ही आमची गरज
जबर टॅरिफ लावण्याच्या ट्रम्प यांच्या धमकीला हिंदुस्थानी परराष्ट्र मंत्रालयाने उत्तर दिले आहे. जागतिक परिस्थितीमुळे आम्हाला रशियाकडून तेल घ्यावे लागते, याचा अर्थ त्यांच्या राजकीय अजेंड्याला आमचा पाठिंबा नाही. त्यामुळे अमेरिकेने हिंदुस्थानला टार्गेट करणे हे अन्यायी आणि अनाठायी आहे. आमच्या आर्थिक हितासाठी आवश्यक ती पावले आम्ही उचलणारच, असे हिंदुस्थानने स्पष्ट केले आहे.