चर्चा फिस्कटली तर गंभीर परिणाम होतील, ट्रम्प यांची पुतिन यांना धमकी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या अलास्का येथील भेटीपूर्वी ट्रम्प यांनी पुतिन यांना, चर्चा फिस्कटली तर गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 6 वर्षानंतर बैठक होत आहे. एंकोरेज येथील एलमेनडॉर्फ रिचर्डसन या लष्करी तळावर ही भेट होणार आहे.

अलास्काला रवाना होण्यापूर्वी ट्रम्प प्रसारमाध्यमांशी बोलले. ते म्हणाले, जर पुतिन यांनी चर्चेत गांभीर्याने सहभाग घेतला नाही आणि चर्चा निष्फळ ठरली तर पुतिन यांना गंभीर आर्थिक परिणाम भोगावे लागतील, अशी इशारावजा धमकी ट्रम्प यांनी दिली. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबवण्याला माझे प्रथम प्राधान्य राहील. युक्रेनच्या वतीने कुठल्याही प्रकारचा सामंजस्य करार करण्यासाठी मी पुतिन यांची भेट घेत नाही, असेही ट्रम्प म्हणाले. मात्र, जर युद्ध थांबवण्यासाठी रशियाने पुढाकार घेतला नाही तर त्याचे खूप वाईट परिणाम होतील असे ते म्हणाले.

ट्रम्प यांनी पुन्हा एकदा हिंदुस्थानवर 50 टक्के कर लादण्याची आणि रशियाकडून तेल आयात केल्यास अतिरिक्त दंड लावण्याची धमकी दिली.