“मोदींनी आश्वासन दिलंय, पण तरीही रशियाकडून तेल खरेदी केले तर…”, डोनाल्ड ट्रम्प यांची हिंदुस्थानला उघड धमकी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानला उघड धमकी दिली आहे. रशियाकडून तेल खरेदी केले तर खूप खूप जास्त टॅरिफ लावू, असे ट्रम्प म्हणाले. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी असा दावा केला होता की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना रशियाकडून तेल आयात बंद करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर आता त्यांनी पुन्हा एकदा या संदर्भात विधान केले आहे. ‘इंडिया टूडे‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

एअर फोर्स वनमध्ये पत्रकारांशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, हिंदुस्थान रशियाकडून तेल खरेदी करणार नाही असे आश्वासन मला त्यांनी (पंतप्रधान नरेंद्र मोदी) दिले आहे. पण ते पुढेही रशियाकडून तेल खरेदी करत राहिले तर त्यांना खूप जास्त टॅरिफ द्यावे लागेल.

ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिकेत ‘नो किंग्स’ आंदोलन; लोक रस्त्यावर उतरले, 2700 ठिकाणी निदर्शने

याआधी काय म्हणाले होते ट्रम्प?

‘नरेंद्र मोदी माझे मित्र आहेत. आमचे उत्तम संबंध असले तरी हिंदुस्थानने रशियाकडून तेल खरेदी करणे आम्हाला पटत नव्हते. कारण त्यातून मिळणारा पैसा रशिया युद्धासाठी वापरत होता. मात्र आता मोदींनी मला शब्द दिला आहे. रशियाकडून तेल खरेदी बंद करणार असे त्यांनी सांगितले आहे. हे मोठे पाऊल आहे. आता चीनलाही तेच करायला भाग पाडायचे आहे, असे ट्रम्प म्हणाले. ‘हिंदुस्थानने रशियाकडून तेल खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र हे लगेच होणार नाही. ही प्रक्रिया वेळखाऊ आणि किचकट आहे,’ असेही ट्रम्प यांनी सांगितले.

50 टक्के टॅरिफ

ऑगस्ट महिन्यात ट्रम्प यांनी हिंदुस्थानी आयातीवर 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यातील 25 टक्के टॅरिफ हा रशियाशी व्यापाराबद्दल दंड म्हणून लावण्यात आला होता. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. दोन्ही देशांतील व्यापार कराराच्या वाटाघाटीही लांबल्या होत्या.