हिंदुस्थानींना नोकऱ्या देऊ नका! मोदींचे मित्र ट्रम्प यांचा गुगल आणि मायक्रोसॉफ्टला दम

हिंदुस्थानात कारखाना उघडू नका, असा सल्ला एलन मस्क यांना देणाऱया अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता गुगल, मायक्रोसॉफ्टसह अनेक कंपन्यांना दम भरला आहे. हिंदुस्थानींसह परदेशी नागरिकांना नोकऱया देणे बंद करा, केवळ अमेरिकेतील लोकांनाच नोकऱया द्या अन्यथा परिणाम वाईट होतील. कंपन्यांच्या अशा वागण्यामुळे अमेरिकेची गुणवत्ता ढासळतेय असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. वॉशिंग्टनमध्ये आयोजित एआय शिखर परिषदेत ते बोलत होते.

परिषदेत ट्रम्प यांनी हिंदुस्थानींना आणि इतर परदेशी नागरिकांना नोकऱया देण्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला. ट्रम्प यांनी अमेरिकेतील तंत्रज्ञानाधारित कंपन्यांमध्ये परदेशी व्यक्तींना घेण्यावरून टीका केली. परदेशी नागरिकांना अमेरिकन कंपन्यांमध्ये घेतल्यामुळे अमेरिकेतील गुणवत्तेकडे दुर्लक्ष केले जात असल्याची भावना निर्माण झाल्याचे ट्रम्प म्हणाले. आता ट्रम्प यांचा काळ आहे, आता ते दिवस संपले आहेत, असा इशारा ट्रम्प यांनी दिला.

मायदेशात रोजगार निर्मिती करा

चीनमध्ये फॅक्टरी सुरू करण्यापेक्षा आणि हिंदुस्थानातील अभियंत्यांना नोकऱया देण्यापेक्षा अमेरिकन कंपन्यांनी आता मायदेशात रोजगार निर्मिती करण्यावर भर द्यायला हवा, असे ट्रम्प म्हणाले.