नवरात्रोत्सवात श्री अंबाबाई चरणी 21 लाखांहून अधिक भाविक नतमस्तक, देवस्थानकडे 57 लाखांची देणगी जमा

यंदा नवरात्रोत्सवात साडेतीन शक्तिपीठांपैकी एक संपूर्ण पीठ असलेल्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी देश-विदेशांतून तब्बल 21 लाखांहून अधिक भाविक नतमस्तक झाले, तर देणगी, अभिषेक व अन्य सेवांच्या माध्यमातून तब्बल 57 लाख 19 हजार 442 रुपयांची देणगी देवस्थानकडे जमा झाली. यात सर्वाधिक 18 लाख 44 हजार 855 रुपये थेट देणगी स्वरूपात प्राप्त झाल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली.

नाईकवाडे म्हणाले, ‘यंदा शारदीय नवरात्रोत्सव 11 दिवस होता. या काळात श्री अंबाबाईच्या दर्शनाला देश-विदेशांतून 21 लाखांहून अधिक भाविक नतमस्तक झाले. दररोज दीड ते दोन लाखांच्या घरात भक्तांची गर्दी होत होती. यंदा मराठवाडय़ातील नैसर्गिक आपत्तीचा भाविकांच्या संख्येवर परिणाम दिसून आला.

दरम्यान, या काळात श्री अंबाबाई मंदिरात आलेल्या भाविकांकडून श्री अंबाबाईला रोख देणगी अर्पण झाली. तसेच पूजा-अभिषेक, अन्नदान, साडी अशा विविध माध्यमांतून भक्तांनी देवस्थानकडे रक्कम अर्पण केली. या रकमेची मोजदाद केली असता, ती 57 लाख 19 हजार 442 रुपये झाली. श्री अंबाबाई मंदिरातील नवरात्र पर्व अश्विन पौर्णिमेपर्यंत चालणार आहे. त्यामुळे अजूनही भक्तांची गर्दी सुरूच आहे. येत्या मंगळवारी (7 रोजी) दुपारी 12 वाजता श्री अंबाबाईच्या महाप्रसादाने उत्सवाची सांगता होणार आहे. देवस्थान समितीने यंदा ‘एआय’चा वापर केल्याने सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरांनाही पकडणे शक्य झाले.