पर्यावरण समृद्धीसाठी प्लॅस्टीकचा वापर टाळा – आमदार कोल्हे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कोपरगांव

प्लॅस्टिकच्या अती वापरामुळे पर्यावरणांचा दिवसेंदिवस ऱ्हास होत असुन त्यातुन अनेक तोटे निर्माण होत आहेत. त्यामुळे पर्यावरण समृध्दीसाठी प्लॅस्टीकचा वापर टाळावा, असे आवाहन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केले.

कोपरगांव शहर व तालुक्यातील ९० महिला बचतगटांना कागदी बॅग तयार करण्यांच्या प्रशिक्षण शिबीराच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. सुषमा महेश धनेश्वर यांनी कागदापासून पाच प्रकारच्या बॅग तयार करण्यांचे प्रशिक्षण यावेळी महिलांना दिले.

आमदार स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाल्या की, प्लॅस्टीक कॅरीबॅगवर युती शासनाने बंदी आणली असून घरातुन खरेदीसाठी बाहेर पडतांना स्वतः कापडी पिशवी जवळ बाळगावी. प्लॅस्टीकच्या अतिवापरामुळे पर्यावरण धोक्यात येवून शहरातील गटारी तुंबण्यांचे प्रमाण वाढले आहे. तसेच भटके पशू प्राणी अन्यत्र पडलेल्या कॅरीबॅग आतील पदार्थांसहीत खातात. परिणामी त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कॅरीबॅग ही प्रत्येकाची सवय बनली होती पण ती आता मोडली पाहिजे आणि कागदी पिशव्यांचा दैनंदिन व्यवहारात वापर वाढला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.