बेजबाबदारपणा नको; अफवांवर विश्वास ठेवू नका – पंतप्रधान मोदी

लस घेतल्यानंतर बेजबाबदारपणे वागू नका. मास्क वापरा, सुरक्षित अंतर ठेवा असे आवाहन करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अफवांवर विश्वास ठेवू नका असे सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सकाळी 10.30 वाजता कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला प्रारंभ झाला. यावेळी संवाद साधताना पंतप्रधान म्हणाले, आपल्या शास्त्रज्ञांना जेव्हा ‘मेड इन इंडिया’ लसीच्या सुरक्षेची आणि परिणामांची खात्री  झाल्यानंतरच लस वापरण्यास परवानगी दिली आहे.

लसनिर्मिती करणारे शास्त्रज्ञ आणि आपल्या वैद्यकीय प्रणालीवर संपूर्ण जगाचा विश्वास आहे. त्यामुळे कोणत्याही अफवा, भुलथापा आणि चुकीच्या प्रचाराला बळी पडू नका. त्यापासून सावध राहा.

जगातील 60 टक्के लहान मुलांना जीवनरक्षक डोस दिले जातात. त्याची निर्मिती हिंदुस्थानात होते. ही अभिमानाची बाब आहे असे पंतप्रधानांनी सांगितले. हिंदुस्थानात मिळणारी कोरोना लस खूप स्वस्त आहे.

विदेशात लसीचा एक डोस पाच हजारांना मिळतो. तसेच उणे 70 डिग्री तापमानात ठेवावी लागते असे ते म्हणाले. एक डोस घेतल्यानंतर जवळपास एक महिन्याने दुसरा डोस घ्यावा लागेल. दुसरा डोस घेण्यास विसरू नका.

लसीकरण झाले म्हणजे बेजबाबदार वागू नका. मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे या नियमांचे पालन सुरूच ठेवावे लागेल असेही पंतप्रधानांनी सांगितले.

काही जण कधीच घरी परतले नाहीत

कोरोना संकट काळातील वेदनांचे स्मरण करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, अनेकजण आपल्याला सोडून गेले. आपले डॉक्टर्स, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कामगार, पोलीस यांनी मानवतेसाठी आपले कर्तव्य बजावले. कित्येक दिवस घरी गेले नाहीत.

शेकडो लोक असेही आहेत जे पुन्हा कधी घरी गेलेच नाहीत. त्यांनी दुसऱयाचा जीव वाचविण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. असे सांगताना पंतप्रधान मोदी यांना गहिवरून आले.

आपली प्रतिक्रिया द्या