मालवणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण या चबुतऱ्यावर 11 टन वजन असेल अशी माहिती आपल्याला देण्यात आली होती, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम आपल्याकडे नव्हतंच, आपल्याकडे फक्त चबुतऱ्याचं कामं देण्यात आलं होत अशी माहितीही पाटील यांनी दिली आहे.
चेतन पाटील यांनी मराठी वृत्तवाहिनी एबीपी माझाशी संवाद साधला. तेव्हा पाटील म्हणाले की राजकोटमध्ये जो छत्रपती शिवाजी महाराजांचा उभारला गेला त्याच्याशी माझा काही संबंध नाही. त्यासंबंधित आपल्याकडे कुठलेही कागदपत्र नाहीत. नौदलाला मी केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आलेल्या चबुतऱ्याचे डीझाईन बनवून दिले होते असे पाटील म्हणाले. तसेच या चबुतऱ्यावर 11 टन वजन असेल असे आपल्याला सांगण्यात आले होते. त्यानुसारच या चबुतऱ्याचे डिझाईन मी नौदलाला बनवून दिले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे कंत्राट ठाण्याताली एका कंपनीला दिले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा आणि माझा काही संबंध नाही असे पाटील म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आपटे आणि पाटील दोघेही बेपत्ता झाले होते. पण पोलिसांनी जरी गुन्ह्यात माझे नाव टाकले तरी या पुतळ्याच्या कामाशी आपला संबंध नाही, योग्य वेळ आली तर न्यायालयासमोर मी सर्व पुरावे सादर करेन असेही पाटील म्हणाले.