डच खुली बॅडमिंटन स्पर्धा,लक्ष्य सेनची अंतिम फेरीत धडक

389

हिंदुस्थानचा उदयोन्मुख बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने शनिवारी रात्री डच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरी गटाच्या अंतिम फेरीत धडक मारली. १८ वर्षीय लक्ष्यने ३३ मिनिटे रंगलेल्या उपांत्य लढतीत बेल्जियमच्या फेलिक्स बुरेस्टेड याचा २१-१२, २१-९ असा धुव्वा उडवत अंतिम फेरीत धडक मारली . त्याला आता अंतिम फेरीत जपानच्या युसेक ओनोडेरा याच्याशी लढत द्यावी लागेल.

त्याआधी लक्ष्यने उपांत्यपूर्व फेरीत आपल्याच देशाच्या राहुल भारद्वाजवर २१-९, २१-१६ असा दोन गेममध्ये विजय मिळवला होता. लक्ष्यने गेल्या महिन्यातच बेल्जियम स्पर्धेचे विजेतेपद मिळवले असून त्याने गेल्यावर्षी झालेल्या युवा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत रौप्य पदकावर नाव कोरले होते. मात्र जर्मनीच्या काई शेफरने हिंदुस्थानच्या चौथ्या मानांकित सौरभला २१-१७, १०-२१, २१-१९ असे नमवून त्याचे आव्हान संपुष्टात आणले.

मेडव्हीडेवने पटकावले शांघाय मास्टर्सचे जेतेपद
शांघाय – रशियाच्या युवा डॅनिली मेडव्हीडेवने शांघाय ओपन टेनिस स्पर्धेत जर्मनीच्या अलेक्झांडर झिरेव्हला ६-४,६-१ असे सहज पराभूत करीत शांघाय मास्टर्स ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.मेडव्हीडेवचे हे यंदाच्या हंगामातील चौथे जेतेपद आहे. त्यामुळे त्याच्याकडे आता नोव्हाक जोकोव्हिक,राफेल नदाल आणि रॉजर फेडरर या “बिग थ्री” टेनिसपटूंना टक्कर देऊ शकणारा समर्थ युवा खेळाडू म्हणून पाहीले जात आहे.

जागतिक चौथ्या मानांकित मेडव्हीडेवने पाचव्या प्रयत्नांत झीरेव्हला पराभूत करण्याची किमया साधली.त्याने या शानदार विजयासाठी ७४ मिनिटे घेतली.अमेरिकन ओपन उपविजेत्या मेडव्हीडेवने गेल्या काही स्पर्धांत आपली शानदार चमक दाखवत टेनिस जगतात आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या