प्रयागराज उच्च न्यायालयाने आदर्श यादवची याचिका फेटाळताना नमुद की, मृत व्यक्ती ही कायदेशीररीत्या त्या व्यक्तीची विवाहित पत्नी नव्हती, परंतु, कोर्टात सादर केलेल्या पुराव्यावरून असे दिसून येते की दोघेही रिलेशनशीपमध्ये पती-पत्नीसारखे एकत्र राहत होते, त्यामुळे या प्रकरणात हुंडा मृत्यूच्या तरतुदी लागू होतात.
लिव्ह इन रिलेशनशिप राहणाऱया जोडप्याबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला. पती-पत्नीसारखे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्यांना हुंडाबळी प्रकरणात आरोपी बनवले जाऊ शकते, असे उच्च न्यायालयाने म्हटले. पती-पत्नीसारखे राहणे हा हुंडाबळीसाठी पुरेसा आधार असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले.
प्रयागराज येथील उच्च न्यायालयात आदर्श यादव यांची याचिका फेटाळताना उच्च न्यायालयाने हे नमूद केले. आदर्श यादवच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. आदर्श यादव याच्यावर हुंड्यासाठी छळ केल्याच्या आरोप असून प्रयागराज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
यादवने लिव्ह इन प्रेयसीवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप आहे. प्रियकराच्या या छळाला कंटाळून प्रेयसीने आत्महत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले होते. आरोपीने निर्दोष मुक्तीसाठी याचिका दाखल केली होती, ती सत्र न्यायालयाने फेटाळली होती. त्यानंतर त्याने उच्च कोर्टात धाव घेतली. ‘मी तिचा पती नाही, त्यामुळे माझ्यावर हुंड्यासाठी छळाचा गुन्हा दाखल करता येणार नाही,’ असे याचिकाकर्त्याच्या वतीने सांगण्यात आले.