
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या कार्यालयातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शहीद भगतसिंग यांचे फोटो हटवून त्याजागी पंतप्रधान नरेंद्र मोदी, महात्मा गांधी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे फोटो लावण्यात आले. यावरून विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक प्रचंड आक्रमक झालेले दिसले. यावरून जोरदार हंगामा झाला. दरम्यान, विरोधी पक्षनेत्या अतिशी यांनी भाजपने महिलांना महिना अडीच हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी अतिशी यांनी मुख्यमंत्री कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केले.
आज सकाळी मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना अतिशी त्यांच्या दालनात भेटल्या. त्यानंतर अतिशी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शहीद भगतसिंग यांचा फोटो हटवण्यात आल्याचा मुद्दा सभागृहात लावून धरला. त्यापूर्वी त्यांनी एक्सवरून भाजपच्या कृतीविरोधात प्रचंड नाराजी व्यक्त केली. तर त्यांचेच ट्विट रिट्विट करत माजी मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनीही भाजपवर निशाणा साधला. दिल्लीतील नवीन भाजप सरकारने बाबासाहेबांचा फोटो हटवून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावला आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. यामुळे बाबासाहेबांच्या कोटय़वधी अनुयायांच्या भावना दुखावल्या जातील, असे केजरीवाल म्हणाले. तसेच माझी भाजपला विनंती आहे की त्यांनी त्यांच्या पंतप्रधानांचा फोटो जरूर लावावा. परंतु त्यासाठी बाबासाहेबांचा फोटो हटवू नये. त्यांचे फोटो तिथेच राहू द्यावेत, असे ट्विट केजरीवाल यांनी केले.
आपच्या विधानसभेत घोषणा आणि गोंधळ
मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगत सिंग यांचे फोटो काढून टाकल्याबद्दल विरोधकांनी विधानसभेत प्रचंड गदारोळ केला. आपच्या घोषणाबाजीनंतर भाजपच्या आमदारांनीही उभे राहून त्याला विरोध करत ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या. त्यामुळे सभागृहात गोंधळाची स्थिती निर्माण झाली. गदारोळ सुरूच राहिल्याने विधानसभा अध्यक्ष विजेंद्र गुप्ता यांना काही काळासाठी कामकाज तहकूब करावे लागले. आपने या प्रकरणी सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. अतिशी यांनी सभागृहात आणि सभागृहाबाहेरही आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले.
भाजपची दलित आणि शीखविरोधी मानसिकता
आम आदमी पार्टीने दिल्ली सरकारच्या प्रत्येक कार्यालयात डॉ. आंबेडकर आणि भगत सिंग यांचे फोटो लावले. परंतु भाजपने हे फोटो कार्यालयातून हटवले. यावरून भाजपची मानसिकता शीख आणि दलितविरोधी असल्याचा आरोप आप नेत्या आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री अतिशी यांनी केला. दरम्यान, भाजपकडून मुख्यमंत्री कार्यालयाचा फोटो एक्सवर पोस्ट करण्यात आला. यात मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीच्या मागील भिंतीवर राष्ट्रपती, महात्मा गांधी आणि पंतप्रधानांचा फोटो दिसत आहे. तर उजव्या बाजूला डॉ. आंबेडकर आणि भगत सिंग यांचे फोटो दिसत आहेत. याचाच अर्थ रेखा गुप्ता यांनी पह्टोंची केवळ जागा बदलली आहे असे स्पष्ट होते, असे भाजपने म्हटले आहे.
पत्रकारांना आतून-बाहेरून दाखवणार शीशमहल
आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सरकारी निवासस्थानाबद्दल भाजपने एक मोठी घोषणा केली आहे. हा बंगला पत्रकारांना आता आतून आणि बाहेरून दाखवला जाणार आहे. हा बंगला सिव्हिल लाईन्सच्या फ्लॅगस्टाफ मार्गावर आहे. या बंगल्याच्या नूतनीकरणासाठी केजरीवाल यांनी लाखो रुपये खर्च केले होते, असा आरोप भाजपने केला. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने या मुद्दय़ावर प्रचार केला होता.





























































