डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथसंपदेच्या छपाई कामाला गती द्या!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथसंपदेची अतिशय संथगतीने छपाई सुरू असून यासंदर्भातील वृत्ताला आता मुंबई उच्च न्यायालयाने जनहित याचिकेत परावर्तित केले आहे. किमान आता तरी या प्रक्रियेतील गतिरोध दूर करून तातडीने या कामाला गती देण्यात यावी, अशी विनंती विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य पुनर्प्रकाशित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना शुक्रवारी पत्र लिहिले आहे. जगातील सर्वोत्कृष्ट संविधान ज्यांनी हिंदुस्थानला दिले त्या डॉ. बाबासाहेबांच्या ग्रंथसंपदेच्या प्रकाशन कार्याची प्रचंड दूरवस्था होत आहे. आपण तातडीने या कामात लक्ष देण्याची आणि त्यादृष्टीने संबंधितांना निर्देश देण्याची नितांत गरज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भाषणे खंड 18 -भाग 1, भाग 2 आणि भाग 3 या अंकांची प्रचंड मागणी असताना सुद्धा वाचक, अभ्यासक, विद्यार्थी यांना त्यासाठी खोळंबून राहावे लागत असल्याचे फडणवीस यांनी पत्रात म्हटले आहे. या सर्व बाबींची दखल 2 डिसेंबर रोजी उच्च न्यायालयाने सुद्धा घेतली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हा अनमोल सांस्कृतिक, सामाजिक, वैचारिक आणि ऐतिहासिक ठेवा आहे. किमान या कामात तरी खर्च आणि मनुष्यबळाच्या निर्बंधाचे मापदंड लागू नयेत, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.