
देशवासीयांना उत्सुकता असलेले इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाचे 44 टक्के काम पूर्ण झाले आहे. पुढील तीन महिन्यांत डॉ. आंबेडकरांचा पुतळा व त्याखालील भव्य स्ट्रक्चर वगळता उर्वरित सर्व कामे पूर्ण होणे अपेक्षित आहे. पुतळ्याच्या दोन्ही पायांचे बूट तयार असून त्यापैकी डाव्या पायाचा बूट 6 डिसेंबरच्या आधी स्मारकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पाहण्यासाठी ठेवण्यात येणार आहे. आंबेडकरप्रेमींसाठी ही पर्वणी ठरणार आहे.
हिंदुस्थानच्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक चैत्यभूमी जवळच्या इंदू मिल परिसरात उभे राहत आहे. स्मारकाच्या बाहेरील बहुतेक कामे पूर्ण झाली आहेत. स्मारकातील एक हजार आसन क्षमतेचे ऑडिटोरियम, ग्रंथालय, कलादालन, लेक्चर हॉल, चवदार तळ्याची प्रतिकृती ही कामे शेवटच्या टप्प्यात आहेत. ही कामे येत्या तीन महिन्यांत पूर्ण होतील. स्मारकाच्या ठिकाणी 500 गाडय़ा पार्क करता येतील असे भूमिगत वाहनतळ तयार झाले आहे, असे अधिकाऱयांनी सांगितले.
डिसेंबर 2026 पर्यंतचे टार्गेट
येत्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा स्मारकात उभारला जाईल, त्यानंतर काही दिवसांत पुतळ्याखालील स्ट्रक्चरचे काम पूर्ण करून डिसेंबर 2026 पर्यंत संपूर्ण स्मारक बनून तयार होईल, असे अधिकाऱयांनी सांगितले.
60 फूट लांब, 20 फूट उंचीचा बूट
प्रख्यात शिल्पकार राम सुतार यांच्या नोएडा येथील कार्यशाळेत डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याच्या दोन्ही पायांचे बूट तयार झाले आहेत. 60 फूट लांब व 20 फूट उंचीचे हे बूट लवकरच मुंबईत आणले जातील.































































