विद्यावाचस्पती हरपला… डॉ. बद्रीनारायण श्रोत्रीय यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
badrinarayan-shrotriy

हिंदी भाषेचे प्रकांडपंडित, धर्माबादच्या लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयातील हिंदी विभागाचे माजी प्रमुख विद्यावाचस्पती डॉ. बद्रीनारायण श्रोत्रीय यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने जालना येथे निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. डॉ. श्रोत्रीय यांच्या पश्चात सौ. वीणा, सौ. संगीता या दोन मुली, श्रीरंग जोशी, डॉ. सुरेंद्र पडगलवार हे जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

विद्यार्थीप्रिय प्राध्यापक असणाऱ्या डॉ. श्रोत्रीय यांच्या निधनाने सरस्वतीचा वरदहस्त लाभलेला विद्वान हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. काव्यसंमेलनांचे खुमासदार संचलन, आपल्या मधुर वाणीने विविध समारंभांचे खुसखुशीत, प्रभावी आणि प्रवाही निवेदन यासाठी डॉ. श्रोत्रीय प्रसिद्ध होते. निवृत्तीनंतर धर्माबाद सोडून जालना येथे स्थायिक झालेल्या डॉ. श्रोत्रीय यांनी लॉयन्स क्लबच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रमांत सहभाग घेतला. आज दुपारी जालना येथे डॉ. श्रोत्रीय यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.