हर्षल पाटीलनंतर आता पुढचा नंबर माझा! ‘तो’ मेसेज वाचून जितेंद्र आव्हाड यांच्या पायाखालची जमीन सरकली

सरकारने जलजीवन मिशन योजनांच्या कामांचे पैसे न दिल्याने निराश होऊन सांगलीच्या वाळवा तालुक्यातील तांदूळवाडी गावातील 35 वर्षीय कंत्राटदार हर्षल पाटील यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. हर्षल पाटील यांची सरकारकडे 1 कोटी 40 लाखांची बिले थकीत होती. सावकार व इतर लोकांकडून त्यांनी जवळपास 65 लाखांचे कर्ज घेतले होते. त्यांनी पैशासाठी तगादा लावल्याने पाटील हैराण झाले होते. याच विवंचनेतून त्यांनी मृत्युला कवटाळले. त्यांच्या आत्महत्येवरून सरकारवर प्रचंड टीका होत आहे. याच दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक खळबळजनक पोस्ट शेअर केली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून हर्षल पाटील यांना श्रद्धांजली वाहिली होती. यावर एका तरुण कंत्राटदाराने प्रतिक्रिया दिली आहे. ही प्रतिक्रिया वाचून जितेंद्र आव्हाड यांच्या पायाखालची जमीन सरकली असून या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

काय होती पोस्ट?

जितेंद्र आव्हाड म्हणतात, सरकारच्या लोकप्रिय योजनांमागचं असंवेदनशील वास्तव! हर्षल पाटील – वाळवा तालुक्यातील एका मेहनती तरुणाची आत्महत्या! हर्षल पाटील – सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातल्या तांदुळवाडी गावचा एक कष्टाळू, तरुण कंत्राटदार.त्याने सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत गावांमध्ये पाणी पोहोचवण्याचं काम पूर्ण केलं.पण… काम झालं, बिलं दिली, पण बिचाऱ्याला पैसे मिळालेच नाहीत! त्याचे सरकारकडे 1.40 कोटी इतकी थकबाकी होती. पैसे मिळत नाहीत म्हणून त्याने 65 लाखांचं कर्ज काढलं… आणि शेवटी आर्थिक तणावात येऊन फास घेऊन स्वतःचं आयुष्य संपवलं! पाठीमागे पत्नी, लहान मुलगी, वृद्ध आईवडील, आणि दोन लहान भाऊ…यांना ठेवून.

कंत्राटदार हर्षल पाटीलची आत्महत्या हा सरकारने केलेला सदोष मनुष्य वध, संजय राऊत यांचा घणाघात

“लाडकी बहीण योजना” – एक लोकप्रिय योजना असली तरी ती आर्थिकदृष्ट्या राज्याला पेलवणारी योजना नाहीये.एकीकडे या योजनेसाठी सरकारनं कोट्यवधी रुपयांचा निधी बाजूला काढला.राज्यावर कर्जाचा बोजा वाढवला.दुसरीकडे मात्र जिल्हा परिषद, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा खात्यांची हजारो कंत्राटदारांनी पूर्ण केलेल्या कामांचं बिल अडवली गेली आहेत.कारण राज्य सरकारकडे ही बिलं देण्यासाठी पैसेच नाहीयेत. मी मागे म्हणालो होतो, “काही महिने जाऊ द्या..कितीतरी कंत्राटदार आत्महत्या करतील…!” दुर्दैवाने त्याची सुरुवात झाली आहे.आज हर्षल पाटील गेलाय,पण उद्या अजून किती जण या दुर्दैवी फेऱ्यात अडकतील,याची कल्पनाच न केलेली बरी, असेही आव्हाड म्हणाले.

हे केवळ आर्थिक संकट नाही – तर प्रशासकीय अपयश देखील आहे! निवडणुका जिंकण्यासाठी लोकांना मोफत सुविधा द्यायच्या, पण त्या माग आवश्यक असणारा आर्थिक ताळेबंद साधायचा नाही. हर्षल पाटील यांची आत्महत्या ही केवळ एक वैयक्तिक दु:खद घटना नाही – ती एक इशारा आहे. राज्य शासन, प्रशासन आणि समाजाने ही गोष्ट गांभीर्याने घेणं गरजेचं आहे, असेही आव्हाड यांनी म्हटले.

आता पुढचा नंबर माझा असेल!

दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्या पोस्टवर एका तरुण कंत्राटदाराने प्रतिक्रिया दिली आहे. त्याने आव्हाड यांना मेसेज केला. आपली ही पोस्ट बघितली आणि पुढचा नंबर माझाला असेल का असे वाटत आहे. मी सुद्धा सरकारी कामं केली आहेत. माझी देखील अनेक बिलं थकीत आहेत, असा मेसेज तरुणाने केला. याचा स्क्रीनशॉट आव्हाड यांनी शेअर करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे.