संस्कृतायन – सुकुमार सौंदर्यासक्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. समिरा गुजर जोशी
[email protected]

ज्याने निसर्गाचे रौद्र रूप अनुभवले आहे आणि आपल्या काव्यातून तितक्याच उत्कटपणे मांडले आहे असा महाकवी कालिदास. निसर्गाचे सौंदर्य आणि सामर्थ्य ओळखून असणाऱया या सुकुमार वृत्तीच्या कवीने ग्रीष्माच्या काहिलीचे वर्णनही तितकेच अप्रतिम केले आहे.

आपण ऋतुसंहार या काव्यातील उन्हाळ्याचे वर्णन अनुभवतो आहोत. नगरातील नागरिकांची अवस्था आपण मागील भागात पाहिली. उन्हाळ्याचा ताप सुसह्य करण्यासाठी त्यांच्याकडे अनेक उपाय आहेत. वनातील मुक्या प्राण्यांकडे मात्र असे कोणतेही उपाय नाहीत. तहानेने व्याकुळ झालेले हे मुके जीव त्यांनी काय बरे करावे.

कालिदासाने जंगलातल्या रणरणत्या उन्हाचे आणि त्यामुळे बदललेल्या प्राणीसृष्टीचे इतके अप्रतिम वर्णन केले आहे. एखाद्या डिस्नेच्या फिल्ममधली रंगीत अॅनिमेशन्स सुद्धा फिकी पडतील अशी ही शब्दचित्रे आहेत. तहानेने व्याकुळलेले हे जीव…आसमंतात कोठे तरी उन्हामुळे मृगजळाचा भास तयार होतो आणि ते जलाशय आहे असे वाटून प्राण्यांचे कळप त्या दिशेने धावत सुटतात. अर्थात कितीही धावले तरी त्यांच्या पदरी निराशाच पडते. यानंतर मग कल्पनेची प्रचंड मोठी झेप घेणारा एक श्लोक येतो. कालिदास ‘कालिदास’ का आहे हे सांगणाऱया ज्या जागा असतात अशा जागांपैकी आहे असे मला नेहमीच वाटते.

रवेर्मयूखैरभितापितो भृशम्। विदह्यमानः पथि तप्तपांसुभिः ।
अवाङ्मुखो जिम्हगतिः श्वसन् मुहुः
फणी मयूरस्य तले निषीदति ।।

काय दृश्य आहे पहा – सूर्याच्या किरणांनी अतिशय तापलेला व वाटेवरच्या तापलेल्या धुळीने भाजून निघणारा, खाली मान घालून वेडय़ावाकडय़ा गतीने चालणारा, धापा टाकणारा साप मोराच्या खाली (सावलीत) आश्रय घेतो. गंमत आहे बघा. आपला सगळा अहंकार वगैरे असतो ना तो आपण सुखात असतो तेव्हा. पण दुःखात मात्र प्राणी असो वा माणसं, एकमेकांशी भलेपणाने वागतात.

थोडक्यात दुःख, त्रास आपल्याला नम्र बनवतात. आता मोर सापाचा सहज शत्रू आहे. साप दिसला की मोर त्याला खाणार हे ठरलेले. पण आता इतका भयंकर उष्मा आहे की कुणाच्याच अंगी त्राण नाहीत. क्षणभर सावली मिळाली तर ती प्राणांपेक्षाही प्रिय वाटते आहे. म्हणून तर एवढा भला थोरला साप. ज्याने नुसता फणा उगारला तर कोणीही भयभीत व्हावे. त्याची वळणदार हालचाल आपण एरवी डोळे भरून पाहावी. तो तापल्या धुळीत कसाबसा सरपटतो आहे. त्याला कुठेतरी निष्पर्ण झाडावर फांदीवर बसलेला मोर दिसतो. त्याच्या पिसाऱयाची सावली जमिनीवर पडली आहे. ती पाहून कोणताही मागचा पुढचा विचार न करता तो साप त्या सावलीकडे धडपडत निघतो. आज मोरही याला आक्षेप घेण्याच्या स्थितीत नाही. जणू युद्धसंधी केलेल्या दोन राजांप्रमाणे ते एकमेकांचे सह-अस्तित्व सहन करत आहेत.

सगळ्या वातावरणात एक आगळे वेगळे सामंजस्याचे वातावरण तयार झाले आहे. अत्यंत तहानेमुळे पराक्रम थंडावलेला, तोंड पूर्ण उघडून जीभ बाहेर काढून वारंवार श्वास घेणारा व आयाळ हलविणारा सिंह जवळच असलेल्या हत्तींना मारीत नाही. तर दुसऱ्या बाजूला सूर्याच्या किरणांनी तापलेले, कंठाला कोरड पडलेले व सोंडेने पाण्याचे थेंब शोषणारे, अत्यंत तहानलेले हत्ती आता सिंहालाही घाबरत नाहीत. चिखल वाळून गेलेले, थोडे वाळलेले नागरमोथा गवत असलेले एखादे तळे आहे. सूर्याच्या प्रखर किरणांनी अत्यंत त्रासल्याने रानडुकरांचा कळप (आपल्या) दणकट गोलाकार नाकाडाने (तीक्ष्ण रुंद सुळ्यांनी) खणत जणू काही जमिनीत शिरत आहे. थोडा पाण्याचा ओलावा त्या मातीत अजून असेल अशा आशेने इतका थोरला हा प्राणी अक्षरश लोटांगण घालतो आहे. या सगळ्याच दृश्यांमधले बारकावे बघा. प्रत्येक प्राण्याच्या देहबोलीचे केवढे निरीक्षण आहे. अशामध्ये आणखी एक संकट आहे ते म्हणजे या सुकलेल्या झाडांच्या फांद्या एकमेकांवर घासल्या जाऊन लागणारे वणवे. कालिदास लिहितो, वाऱ्याने भडकवलेला व डोंगराच्या दऱयांमधून आवाज करणारा, वाळलेल्या बांबूच्या बनात मोठा आवाज करून फुटणारा, क्षणोक्षणी गवतामध्ये पसरणारा वनातला अग्नी प्राण्यांना कष्टप्रद होतो.

कालिदास निसर्गकवी आहे असे आपण म्हणतो खरे. पण निसर्गकवी म्हणजे केवळ फुलांवर, झाडावेलींवर कविता करणारा कवी नव्हे. ज्याने निसर्गाचे रौद्र रूप अनुभवले आहे आणि आपल्या काव्यातून तितक्याच उत्कटपणे मांडले आहे असा कवी. ज्याला निसर्गाचे केवळ वसंतातले मोहक रूपच ठाऊक असेल तर ती मर्यादा मानली पाहिजे, नाही का? आणि ही कसोटी लावली तर जगातले किती कवी निसर्गकवी ठरतील हा वेगळा प्रश्न आहे. पण कालिदास मात्र निसर्गाचे सौंदर्य आणि सामर्थ्य दोन्ही ओळखून आहे. हा बागेतला निसर्ग नाही, हा वनातला रांगडा निसर्ग आहे. कालिदासासारखा सुकुमार वृत्तीचा कवी हे अशा अरण्याचे निरीक्षण कसे, केव्हा करत होता हा प्रश्न मनात येत राहतो.

(लेखिका निवेदिका, अभिनेत्री आणि
संस्कृत – मराठी वाङमयाच्या अभ्यासक आहेत.)