
सामना प्रतिनिधी । पाथर्डी
लोकसभा निवडणुकीतील भाजपचे संभाव्य उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी काल रात्री कासार पिंपळगाव येथे आमदार मोनिका राजळे यांची भेट घेत एक तास चर्चा केली.या भेटी विषयी कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, जिल्ह्याच्या राजकारणात माजी आमदार अप्पासाहेब राजळे हे माजी मंत्री बाळासाहेब राजळे यांचे समर्थक व व्याही असल्याने स्व. बाळासाहेब विखे यांनी नेहमीच राजळे यांना पक्षांतर्गत विरोध करण्याचे काम केले होते. तालुक्यात विखे यांना मानणारे जे कार्यकर्ते होते त्यांनी सुद्धा राजळे यांच्या विरोधात आजपर्यंत भूमिका घेतली होती. या शिवाय माजी आमदार स्व. राजीव राजळे यांनी दोन वेळा लढवलेल्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा विखे गटाने राजळे विरोधात भूमिका घेतली होती. काळाच्या ओघात बाळासाहेब विखे यांचे निधन झाल्या नंतरही स्व. राजीव राजळे विरोधात विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे यांच्यातही सुप्त संघर्ष चालूच होता. मागील वेळेस झालेल्या पालिका निवडणुकीतही राधाकृष्ण विखे व डॉ. सुजय विखे यांनी शहरात येत पॅनल उभे करून त्यात काही राजळे समर्थकांना उमेदवारी दिली होती.
विखे राजळे घराण्यात असा सुप्त संघर्ष चालू असतानाच सुजय विखे यांनी भाजपचे कमळ हातात घेतल्या नंतर राजळे गटात अस्वस्थता निर्माण झाली होती. विखे यांचा मुंबई येथे जो भाजप पक्ष प्रवेश झाला, त्या सोहळ्यास आमदार राजळे वगळता त्यांचे कोणतेही समर्थक या सोहळ्यास उपस्थित नव्हते. या पार्श्वभूमीवर काल रात्री दहा च्या सुमारास सुजय विखे हे राजळे यांचे गाव असलेल्या कासार पिंपळगाव येथे गेले व त्यांनी माजी आमदार अप्पासाहेब राजळे यांचे आशीर्वाद घेतले. आमदार मोनिका राजळे, जी. प. सदस्य राहुल राजळे यांची भेट घेत त्यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीविषयी एक तास चर्चा केली.
































































