
>> डॉ. सुनीलकुमार सरनाईक
शिवकालापासून आधुनिक काळापर्यंत चालत आलेला हा मराठी पोवाडा हा एक विलक्षण आणि महत्त्वपूर्ण वाङ्मय प्रकार आहे. निपाणी, कारवार बेळगाव, बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे…! अशी गगनभेदी ललकारी देत इथल्या शाहिरांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात फार मोठी कामगिरी बजावली होती. महाराष्ट्राच्या लोककलेच्या वैभवी परंपरेत शाहीर आणि त्यांचा पोवाडा यांनी अलौकिक सन्मान प्राप्त केला आहे.
मराठी पोवाडय़ाने मराठी जनमानसावर नेहमीच अधिराज्य गाजविले आहे. परामी व स्वाभिमानी महाराष्ट्राच्या अस्मितेला जागृत ठेवण्याचे काम आजवर त्याने अगदी तडफेने केले आहे. परिवर्तनशील जीवन संघर्षात निर्माण होणाऱया सामाजिक आणि राजकीय जाणिवांचा आविष्कारही मराठी पोवाडय़ाने मोठय़ा सृजनशीलतेने केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात `गोंधळी’ समाजातील लोकांनी कवनांचा एक नवीन प्रकार प्रचारात आणला. हा प्रकार `पोवाडा’ म्हणून पुढे आला. डफ आणि तुणतुणे म्हणजेच चर्मवाद्य आणि तंतुवाद्याचा चपखलपणे वापर करून त्याच्या साथीने म्हटला जाणारा हा एक काव्य प्रकार होय. हा काव्य प्रकार मुख्यत वीररसाला पोषक ठरू लागला. मराठी वाङ्मय प्रकारात एक नवीन `शाहिरी’ वाङ्मयाची भर पडली आणि मराठी वाङ्मय या काव्य प्रकारामुळे समृद्ध व संपन्न झाले. बाराव्या शतकांपासून शिवकालापर्यंत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकोबाराय यांसह अनेक संतकवींनी विविध प्रकारची काव्यरचना केली. या काव्यरचनेत त्यांचा हेतू परमार्थ साधन हा होता. परमार्थाच्या मार्गावर वाटचाल करताना समाजात सदाचार व सद्विचार निर्माण व्हावा आणि सदाचाराचा हा मार्ग इतरांना दाखवावा यासाठी संतांनी काव्यरचना केली.
काव्यगुणांनी अत्यंत संपन्न व काव्याची अनेक वैशिष्टय़े असलेली संतांची पदे अजरामर झाली आहेत, जनमानसावर तत्कालीन संतकाव्यांनी मोठा परिणाम घडवून आणला. संत, कवीनंतर वामन पंडित, श्रीधर, मोरोपंत इत्यादी पंडित कवींनी रामायण, महाभारत, पांडवप्रताप, भागवत कथा व पुराणातील सरस आणि सुरस कथांचे अनुवाद करून आपले वेगळेपण दाखविले. परमेश्वराचे स्मरण आणि गुणसंकीर्तन हाच त्यांच्या काव्यरचनेतील मुख्य हेतू होता. पंडितांच्या काव्यरचनेत त्यांच्या स्वतंत्र प्रतिभाशैलीचे दर्शन घडते. शिवकालापासून अज्ञानदास ऊर्फ अगीनदास या शाहिरांपासून सुरू झालेली शाहिरी काव्यरचना मात्र संतांच्या आणि पंतांच्या (पंडितांच्या) काव्यरचनेपेक्षा सर्वार्थाने वेगळ्या प्रकारची आहे.
`पोवाडा’ हा शब्द `प्रवाद’ या संस्कृत शब्दापासून झालेला आहे. `प्रवाद’ म्हणजे मोठय़ाने सांगणे किंवा जाहीर करणे, यवनी सत्तेविरुद्ध एत्तद्देशीय मराठे जेव्हा पुढे आले, तेव्हापासून मराठय़ांचे कुलदैवत जगदंबेचे अर्थात भवानी मातेचे नाव घेऊन `गोंधळी’ लोकांनी हा काव्यप्रकार गाण्यास सुरुवात केली. तत्कालीन सामाजिक परिस्थिती लक्षात घेता, अक्षरशत्रू सामान्यजनांचे मनोरंजन करीत असताना जाता जाता काही धर्मनीतिच्या चार गोष्टी सांगता आल्यातर सांगाव्यात हा या शाहिरीकलेचा प्रमुख उद्देश होता. प्रबोधनाचे साधन म्हणूनही त्यांकडे पाहिले जाते.
मराठी माणसाच्या कानावर डफ-तुणतुण्याचा आवाज पडला की त्याचे मन मोहरून जाते. डफावर विलक्षण तडफेने आणि स्फूर्तीने पडलेली शाहिराची थाप ऐकली की मराठी माणसाची छाती अभिमानाने फुलून येते. ग्यानबा-तुकोबांच्या अभंगवाणीत तो जितका रमतो तितकाच शाहिराच्या पोवाडय़ाने आणि लावणीनेही रंगतो.
लोकरंगभूमीचे अभ्यासक डॉ. प्रभाकर मांडे म्हणतात, `महाराष्ट्रामध्ये संतांची परंपरा फार मोठी आहे. संतांनी जनसामान्यांच्या उद्धारासाठी मराठी भाषेचा अवलंब करून अभंग गायिले. समाजासमोर रूपकांच्या माध्यमातून आध्यात्मिक तत्त्वविचार सोपा करून मांडला. `भारूड’ हा स्वतंत्र रचना प्रकार रूढ केला. ललित व भारुडांनी रंगभूमी विकसित केली. एकनाथांनी अनेकविध भारुडे रचली, त्यांच्या काळात `तमाशा’ हा शब्द आढळतो. शाहिरांनी एकापेक्षा एक रंगेल आणि नखरेल लावण्या लिहिल्या. लौकिक आशयाचे पोवाडे, शृंगार विलासाची चित्रे रंगविणारी लावणी सादर केली आणि त्यातूनच स्वतंत्र निराळी रंजनप्रधान रंगभूमी निर्माण केली, विकसित केली.’
लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. रा. चिं. ढेरे म्हणतात, `भवानी मातेच्या प्रेरणेने स्वराज्य स्थापन करण्याची शिवाजी महाराजांची साद महाराष्ट्रातील दऱयाखोऱयांत राहणाऱ्या मावळ्यांच्या काळजाला जाऊन भिडली. आई भवानीच्या नावाने `गोंधळ’ घालणाऱया गोंधळी लोकांनी वीररसात्मक पोवाडे म्हणण्याचा नवा प्रघात पाडला.’ `आंबेडकरी शाहिरी : एक शोध’ मध्ये डॉ. कृष्णा किरवले लिहितात, `ज्ञानेश्वरांच्या पूर्वीच्या महानुभाव संप्रदायाच्या वाड्मयात `डफगाणी’ असा शब्द आहे. पोवाडय़ांचा सर्वात जुना उल्लेख महिकावतीच्या बखरीत आढळतो.’
ज्येष्ठ इतिहास संशोधक वि. का. राजवाडे यासंदर्भात लिहितात, `बिंबराजाचा पुत्र केशवदेव याने मोठय़ा ऐश्वर्याने बारा वर्षे राज्य केले. त्याने राजपितामह म्हणजे आसपासच्या सर्व लहानसहान संस्थानिकांचा आजा, ही पदवी धारण केली व त्या अर्थाचे बडे जावीचे गद्यपद्य पोवाडे रचिले. केशवदेवाच्या काळचे म्हणजे शके 1100-1200 च्या सुमाराचे पोवाडे पद्य आणि गद्य ही असत.’ (महिकावतीची बखर पृ. 37) यावरून शके अकराशेच्या सुमारापासून पोवाडय़ाची परंपरा मराठी वाङ्मयात चालत आलेली दिसून येते.
विजापूरचे संशोधक ना. ब. जोशी यांच्याकडे असलेल्या हस्तलिखितातून प्रा. गंगाधर मोरजे यांनी 14 व्या किंवा 15 व्या शतकातील अज्ञानसिद्ध व बहिरापिसा या दोन कवींने लिहिलेले पोवाडे प्रसिद्ध केले आहेत. (प्रा. गंगाधर मोरजे दोन पोवाडे – मराठी संशोधनपत्रिका, ऑक्टो. 68 पृ. 101) `श्री पवाडा लिखित’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेली अज्ञानसिद्ध याची रचना दीर्घ स्वरूपाची आहे. या पोवाडय़ाचा विषय गुरुस्तुती हा आहे. गुरूचे अलौकिक सामर्थ्य यामध्ये वर्णन केलेले आहे. या पोवाडय़ात कथानक नाही. सामान्यत पोवाडय़ात येणाऱया ऐतिहासिक व्यक्तीच्या परामाचे अथवा वीरमरणाचे चित्र यात नाही. मात्र, रचनाकार म्हणून स्वतचा उल्लेख करताना अज्ञानसिद्ध याने `पवाड’ असा शब्द वापरला आहे. तो महत्त्वपूर्ण वाटतो. हे वर्णन असे आहे.
`ईती श्री वडवाळसीध पुत्र अज्ञानसिध वीरचीत श्री गुरुप्रताप पवाड संपूर्णमस्तु.’
तसेच अज्ञानसिद्धाचा गुरूबंधू असणारा बहिरा पिसा याच्या `श्री बहीरापीसा पवाडा’ या रचनेचे स्वरूप पाहिल्यास ते स्तोत्र (स्तवन काव्य) आहे, असे वाटते. आपल्या गुरूने योगविद्येच्या सामर्थ्याने साक्षात्कार घडवून आपला उद्धार कसा केला, याचे वर्णन त्याने केले आहे. मात्र, बहिरा पिसा याने ही आपल्या पद्यरचनेत शेवट `पवाड’ हा शब्द वापरला आहे… तो असा…..
“ईती श्री पवाडा, पीसा बहीरो वीरचीते, पवाड संपूर्णमस्तु ।।”
शाहिरी वाड्मयाचे अभ्यासक व ज्येष्ठ कविवर्य (कै.) सूर्यकांत खांडेकर यांच्यामते या दोन्हीही पद्यरचनेत प्रारंभी व शेवटी आलेला `पवाड’ हा उल्लेख मूळ रचनाकारांचाच असणे अधिक संयुक्तिक वाटते, त्यामुळे `पवाड’ ही रचना स्तुतिपर, गौरवपर काव्य या स्वरूपात जुन्या काळापासून अस्तित्वात असावी, असे या दोन कवींच्या `पवाड’ या शब्दाच्या उल्लेखावरून वाटते.
[email protected]
(लेखक मानसशास्त्र व लोककलेचे अभ्यासक आहेत.)